Kirana Hills Pakistan News: सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान पाकिस्तानमधील कथित 'रेडिएशन लीक'वरुन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच पाकिस्तानमधील 'किराना हिल्स' प्रदेश जगभरामध्ये चर्चेत आहे. याच ठिकाणी 'रेडिएशन लीक' झाल्याची चर्चा सुरु असून यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. मात्र हा 'किराना हिल्स' भाग आहे तरी काय? तसेच भारताने पाकिस्तानमधील आण्विक सुविधांवर आयएईए निरीक्षण लागू करण्याची मागणी भारताने केली आहे. हे आयएईए म्हणजे काय? याने काय होणार? यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात...
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या आण्विक सुविधांवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए)(IAEA) निरीक्षण प्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून भारताला नुकत्याच मिळालेल्या आण्विक धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या आण्विक साधनांच्या सुरक्षिततेची तपासणी होणे गरजेचे असल्याचं साजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 'आयएईए' निरीक्षण म्हणजे देशाच्या आण्विक क्रियाकलापांची जागतिक निकषांनुसार पडताळणी, जेणेकरून कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन होणार नाही.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए) ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत एक स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था जागतिक आण्विक सुरक्षा, आण्विक ऊर्जा विकास आणि आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापरासंदर्भात काम करते. त्याचे 'इन्सिडेंट अँड इमर्जन्सी सेंटर' (आयईसी) जागतिक आण्विक आणीबाणी व्यवस्थापनासाठी प्रमुख केंद्र आहे. कोणत्याही आण्विक किंवा किरणोत्सर्गीय आपत्तीच्या वेळी हे केंद्र जागतिक स्तरावर संवाद, समन्वय आणि तात्काळ प्रतिसाद यासाठी जबाबदार आहे.
'आयएईए'ने नुकत्याच झालेल्या अहवालांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, "'आयएईए'कडे उपलब्ध माहितीनुसार, पाकिस्तानातील कोणत्याही आण्विक सुविधेतून किरणोत्सर्गाची गळती किंवा उत्सर्जन झाल्याचे संकेत नाहीत." हे विधान 'आयएईए'च्या जागतिक आणीबाणी व्यवस्थापन केंद्राने केलं आहे. कोणत्याही प्रकारच्या आण्विक किंवा किरणोत्सर्गीय घटनेबाबत जागतिक स्तरावर निरीक्षण आणि प्रतिक्रिया 'आयएईए'च्या याच केंद्राकडून नोंदवली जाते.
मे 12 रोजी भारतीय हवाई दलाचे हवाई संचालन महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किरणा हिल्स येथील कोणत्याही आण्विक केंद्रावर हल्ला केला नाही. त्यांच्या वक्तव्याप्रमाणे, "किराना हिल्समध्ये आण्विक केंद्र आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलेत, आम्हाला माहीत नव्हते. आम्ही तेथील कोणत्याही ठिकाणी हल्ला केला नाही."
किराना हिल्स हे पाकिस्तानच्या सरगोधा जिल्ह्यातील एक विशाल खडकाळ पर्वतरांग आहे. या पर्वत रांगेला 'ब्लॅक माउंटन' म्हणून ओळखले जाते. हे क्षेत्र पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि येथे एक गुप्त आण्विक सुविधा असल्याचे मानले जाते.
भारत आणि पाकिस्तानने 31 डिसेंबर 1988 रोजी 'आण्विक केंद्रांवर हल्ल्याच्या मनाई करारावर' स्वाक्षरी केली, जो 27 जानेवारी 1991 रोजी लागू झाला. या करारानुसार, दोन्ही देश दरवर्षी 1 जानेवारीला एकमेकांना त्यांच्या आण्विक केंद्रांची यादी देतात. 2025 मध्ये देखील या करारानुसार, 34 व्या वर्षी ही यादी अदलाबदल करण्यात आली. हा करार दोन्ही देशांमध्ये आण्विक सुविधांची सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केलेला आहे.