Kolkata Rape: कोलकाता पोलिसांनी दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. याआधी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर 25 जूनला बलात्कार झाला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात सुरक्षारक्षक पिनाकी बॅनर्जी कॅम्पसमध्ये उपस्थित होता अशी माहिती समोर आली आहे. आरोपींच्या सांगण्यावरुन तो विद्यार्थिनीला गार्ड रुममध्ये एकटीला सोडून निघून गेला होता.
पोलिसांनी सांगितलं आहे की, मुलीने वारंवार विनंती करुनही सुरक्षारक्षकाने तिची मदत केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकाने कॉलेज प्रशासन किंवा पोलिसांना याची माहिती देणं अपेक्षित होतं, पण त्याने तसं केलं नाही. चौकशीदरम्यान त्याचा हलगर्जीपणा उघड झाला आणि नंतर बेड्या ठोकण्यात आल्या.
मुख्य आरोपी मोनोजित मिश्रावर 24 वर्षीय विद्यार्थिनीला 25 जूनच्या रात्री गार्डच्या रुममध्ये कित्येक तास मारहाण केल्याचा आरोप आहे. मोनोजित हा कॉलेजच्या तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या युनिटचा माजी अध्यक्ष आहे आणि तो तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या दक्षिण कोलकाता शाखेचा संघटनात्मक सचिव असल्याचे वृत्त आहे. इतर दोन विद्यार्थी खोलीत उभे होते आणि गुन्हा घडताना पाहत होते.
दरम्यान तीन आरोपींपैकी एकाच्या वडिलांनी एएनआयशी संवाद साधताना म्हटलं आहे की, "आधी मी भारताचा नागरिक आहे, यानंतर बाप आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून, पोलीस तपास करत आहेत. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. जर माझा मुलगा यात सहभागी असेल तर त्याला कठोर शिक्षा व्हावी. आमचा कोलकाता पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. निर्दोष असेल तर सुटका होईल".
#WATCH | Kolkata, West Bengal | Father of one of the accused in the Kolkata alleged gangrape case, says, "First I am a citizen of India, then a father. The matter is sub-judice and the police are carrying out the investigation. We have trust in the court...Strict punishment… pic.twitter.com/IIbRzphofj
— ANI (@ANI) June 28, 2025
पीडित विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, महाविद्यालयाचे मुख्य गेट बंद होते आणि सुरक्षा रक्षकाला खोलीबाहेर बसवण्यात आले होते. घटनेच्या वेळी सुरक्षारक्षक घटनास्थळी उपस्थित होता, तरीही त्याने हस्तक्षेप केला नाही असा आरोपही तिने केला आहे. मुख्य आरोपी मोनोजित मिश्राला 25 जून रोजी अटक करण्यात आली होती, तर सह-आरोपी 19 वर्षीय प्रथम वर्षाचा विद्यार्थी झैब अहमद आणि दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी प्रमित मुखर्जीला 26 जून रोजी अटक करण्यात आली होती.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुरक्षा रक्षकाच्या खोलीत बलात्कार होत असताना इतर दोन आरोपी उभे राहून पाहत होते अशी माहिती दिली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुलीने तक्रार दाखल केली असून त्यात दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या बैठकीनंतर संध्याकाळी 7.30 वाजता तीन आरोपींनी- ज्यांना ती फक्त 'J', 'M' आणि 'P' या आद्याक्षरांनी ओळखत होती - तिला घेरलं. तिने म्हटलं आहे की 'M' आणि 'P' ने तिला 'J' असलेल्या खोलीत कोंडले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
"मी त्यांना लढा दिला, मी रडले आणि मला सोडून देण्याची विनंतीही केली. मी त्यांच्या पायाही पडले, पण त्यांनी जाऊ दिलं नाही," असं पीडितेने पोलिसांना सांगितलं. "लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतूने त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मी त्यांना सतत मागे ढकलत होते. मी हे करु शकत नाही, माझा प्रियकर आहे आणि माझं त्यावर प्रेम आहे सांगत होते," असंही तिने म्हटलं.
माझ्यावर अत्याचार होत असताना, मला पॅनिक अटॅक आला. मी त्यांच्याकडे इनहेलरदेखील मागितला होता अशी माहिती तिने दिली आहे. "मला पॅनिक अटॅक आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. मग 'जे' ने 'एम' आणि 'पी' ला आत येण्यास सांगितले. मी मदत मागितली पण ते मला मदत करत नव्हते. मग मी त्यांना माझ्यासाठी इनहेलर आणायला सांगितलं. 'एम' ने ते आणलं. मी ते घेतल्यानंतर बरं वाटलं," असं ती म्हणाली आणि पोलिसांना सांगितलं की तिने बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पण पीडितेच्या माहितीनुसार, आरोपींनी तिला पकडलं आणि हल्ला सुरुच ठेवला. मुख्य गेट लॉक होता आणि सुरक्षारक्षकानेही मदत केली नाही असंही ती म्हणाली आहे. तिने सांगितलं की तिला नंतर गार्डच्या खोलीत नेण्यात आले (गार्डला बाहेर काढण्यात आलं). जिथे "'जे' ने माझे कपडे उतरवले आणि माझ्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. मी विरोध केला असताना त्याने मला ब्लॅकमेल केलं. जर कोणाकडे वाच्यता केली तर कुटुंब आणि प्रियकराला मारुन टाकू असं त्यांनी धमकावलं होतं असं तिने सांगितलं आहे.