CM Demand Promotion To PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये ऐतिहासिक चिनाब पूल, अंजी पूल आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचं उद्घाटन केलं. मोदींनी काश्मीरला जाणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच मोदींनी तब्बल 46 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आपल्या या एक दिवसीय दौऱ्यात केलं. दरम्यान, या कार्यक्रमावेळी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील कटार येथील सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं. “अनेक लोकांनी काश्मीरमध्ये रेल्वे आणण्याचे स्वप्न पाहिले होते. ब्रिटिशांनीही काश्मीरला रेल्वेने जोडण्याचे स्वप्न पाहिले होते पण ते अयशस्वी झाले. झेलम नदीच्या काठावर असलेल्या उरी येथून जम्मू आणि काश्मीरला रेल्वेच्या माध्यमातून देशाशी जोडण्याची त्यांची योजना होती. ब्रिटिश जे साध्य करू शकले नाहीत ते तुमच्या (मोदी) हातून घडले आणि काश्मीर देशाच्या इतर भागाशी रेल्वेने जोडले गेले आहे," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयपेयी यांचेही आभार मानायला विसले नाहीत. “याप्रसंगी, मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख न करणे आणि आभार न मानणे चूक ठरेल. या प्रकल्पाची पायाभरणी झाली तेव्हा मी आठवीत शिकत होतो. आता मी 55 वर्षांचा आहे आणि अखेर या पूलाचे उद्घाटन झाले आहे. अटलबिहारी वाजपेयींनी याला ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाचा’ दर्जा दिला आणि त्याचे बजेट वाढवले त्यामुळेच हा प्रकल्प शक्य झाला," असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
A journey to remember and a big boost to connectivity!
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2025
Travelled from the Chenab Rail Bridge to Anji Bridge and thereon to Katra for the public meeting.
Today’s development works will enhance the development journey of Jammu and Kashmir. pic.twitter.com/uMO4CfaeVx
यावेळेस ओमर अब्दुल्ला यांनी मोदींकडे आपल्याला प्रमोशन हवं आहे अशी आगळी-वेगळी मागणी केली. “जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पंतप्रधान झालात, तेव्हा तुम्ही देवीच्या आशीर्वादाने येथे कटरा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. त्यानंतर तुम्ही सलग तीन वेळा निवडणुका जिंकून पंतप्रधान झालात. त्यावेळी आमचे उपराज्यपाल मनोज सिन्हा साहेब तुमच्यासोबत रेल्वे राज्यमंत्र्याची जबाबदारी सांभाळत होते. जर तुम्ही मनोज सिन्हा साहेबांकडे पाहिले तर त्यांना देवीच्या आशीर्वादाने बढती मिळाली. जर तुम्ही माझ्याकडे पाहिले तर माझे डिमोशन झाल्याचे पाहायला मिळेल. त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, आता मी केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. मला आशा आहे की, तुमच्या हातून जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल,” असं अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून खोचकपणे म्हटलं. अब्दुल्ला यांचं भाषण सुरु असताना जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित होते.