Delhi Vidhan Sabha Election Results (दिल्ली निवडणूक निकाल 2025 ) LIVE Updates in Marathi: दिल्लीतील 70 जागांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसून येत आहे. या तिन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय केली असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. मागील 27 वर्षांपासून भाजपाला दिल्लीमध्ये सत्ता मिळवता आलेली नाही. हा दोन तपांहून अधिक काळाचा दुष्काळ संपणार की केजरीवाल यांच्या 'आप'कडेच दिल्लीकर राज्याचा कारभार सोपवणार हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे. याच निकालाचे सर्व अपडेट्स जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये....
दिल्लीतील प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात यमुना मैयाच्या जयघोषाने केली. ते म्हणाले की, मी दिल्लीला आवाहन केलं होतं की, भाजपला 21 व्या शतकात सेवा करण्याची संधी द्यावी. दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्याची भाजपला संधी द्या. मोदींच्या हमीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेप्रती कृतज्ञतेने डोके टेकवून नतमस्तक आहे. दिल्लीने आम्हाला खुल्या मनाने प्रेम दिले.
दिल्लीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी भाजप कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आले आहेत. भाजपने दिल्लीत 48 जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे.
दिल्लीच्या निवडणूक निकालांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर एकता असेल तर ती दिल्लीत सुरक्षित आहे. जर आपण विभागले गेलो तर आपण राजकारणात अडकू. 'आपण एक आहोत तर आपण सुरक्षित आहोत' या घोषणेवर संपूर्ण देश एक झाला आहे. दिल्लीत भाजपने 27 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. अरविंद केजरीवाल खोटेपणा आणि कपटी राजकारण करतात. येणाऱ्या काळात दिल्लीत बदल दिसून येतील.
अरविंद केजरीवाल म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात लोकांनी आम्हाला संधी दिली. आम्ही खूप काम केले. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज आणि इतर अनेक क्षेत्रात लोकांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही दिल्लीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आता, लोकांनी आम्हाला दिलेल्या निर्णयानुसार आम्ही केवळ रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर आम्ही समाजसेवा देखील करू, लोकांच्या सुख-दु:खात मदत करू आणि वैयक्तिकरित्या, ज्यांना आमची गरज असेल, त्यांच्या सुख-दु:खात आम्ही नेहमीच त्यांना मदत करू. कारण आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो नाही.'
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!" असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्वीटच्या सुरुवातीला म्हटलं आहे. पुढे बोलताना, "दिल्लीकरांवरचे गेली 10 वर्षे असलेलं 'आप'चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही 'आपदा' टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद," असंही शिंदे म्हणालेत. "घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे," असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार परवेश वर्मा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. परवेश वर्मा हे मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत.
कालकाजी विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान मुख्यमंत्री आणि आपच्या महिला नेत्या आतिशी यांनी विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार रमेश बिधुडी यांना आतिशी यांनी 3500 मतांनी पराभूत केलं. आतिशी यांना 52 हजार 154 मतं मिळाली तर भाजपाचे उमेदवार रमेश यांना 48 हजार 633 मतं मिळाली. काँग्रेस उमेदवाराला 4 हजार 392 मतं मिळाली.
दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ 0.3 टक्के मतं मिळाली आहेत.
दिल्लीत भाजपाचं कमळ फुलल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. दिल्लीत भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपाने जल्लोष सुरू केला आहे. तर अरविंद केजरीवाल यांची बैठक सुरू आहे.
अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पराभूत झाले आहेत. जंगपुरा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते. अवघ्या 600 मतांनी भाजपाच्या तरविंदर सिंह मारवाह यांनी सोसिदियांना पराभूत केलं आहे.
कोंडली मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी विजय मिळवला आहे. दिल्लीतला पहिला निकाल आपच्या बाजूने लागला असला तरी एकंदरित कलांमध्ये भाजपा 46 जागांवर आघाडीवर आहे तर आपला केवळ 24 जागांवर आघाडी आहे.
दारु घोटाळ्यामुळे 'आप'चा पराभव, आचार विचार महत्त्वाचे हे 'आप'चे नेते विसरले, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
दोन तासांच्या मतमोजणीनंतर केजरीवाल यांना अखेर आघाडी; भाजपा 40 तर आप 30 जागांवर आघाडीवर
दीड तासांच्या मतमोजणीनंतर भाजपा 49 जागांवर आघाडीवर तर आप अवघ्या 20 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने एका जागी आघाडी घेतली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत आपला 42 जागांचा फटका बसला असून दुसरीकडे भाजपाला 40 हून अधिक जागांचा फायदा झाला आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून 'आप'चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवालांविरोधात लढणारे भाजपाचे परवेश वर्मा आघाडीवर आहेत.
सर्व 70 जागांचे कल हाती आले आहेत. भाजपा 41 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे. सत्ताधारी आप अवघ्या 28 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत बहुमताचा 35 जागांचा आकडा भाजपाने प्राथमिक कलांमध्ये ओलांडला असून हे कल कायम राहिले तर दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री बसेल असं सांगितलं जात आहे.
64 जागांचे कल हाती आले असून यापैकी भाजपाने 39 जागांवर आघाडी मिळवली असून आपने 24 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे.
भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपाने 30 जागांवर आघाडी घेतली असून 'आप'ने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे.
भाजपा 24 जागांवर तर आप 19 जागांवर आघाडीवर; काँग्रेस एकाच जागी आघाडीवर
32 जागांचे कल हाती! भाजपा-आपमध्ये काँटे की टक्कर; काँग्रेस एका जागी आघाडीवर
भाजपा-आपमध्ये काँटे की टक्कर दिसत असून भाजपाने 17 जागांवर तर आपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.
आपचे मंत्री तसेच माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया जंगापुरा मतदारसंघातून पिछाडीवर. कालकाजीमधून मुख्यमंत्री अतिशी आघाडीवर
नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. इथून परवेश वर्मा आघाडीवर आहेत. हाती आलेल्या 24 जागांवरील कलांनुसार भाजपा 14 ते आप 11 जागांवर आघाडीवर
70 पैकी 20 जागांचे कल हाती आले असून भाजपा आणि आपमध्ये थेट संघर्ष दिसत आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 10 जागांवर आघाडी घेतली आहे.
पहिल्या 17 जागांचे कल हाती आले असून भाजपा 10 जागांवर तर आप 7 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने खातंही उघडलेलं नाही.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. पोस्टल मतांच्या मोजणीने झाली सुरुवात. पहिला कल हाती आला असून भाजपा आणि 'आप' प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर.
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात होणार. आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे.
एकेकाळी दिल्लीवर एकहाती राज्य केलेल्या काँग्रेसची मागील काही वर्षांमध्ये या अत्यंत महत्त्वाच्या राज्यात दयनीय अवस्था झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही इतक्या स्तराला काँग्रेसची पडझड झाल्याने यंदाची निवडणूक ही काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या हाती पुन्हा निराशाच लागणार अशी चिन्हं दिसत आहेत.
2015 पासून सातत्याने दिल्लीमध्ये सत्ता काबीज करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला अँटी इकम्बन्सीचा फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मद्य परवाना घोटाळ्याबरोबरच वारंवार वेगवेगळ्या कारणांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागील पाच वर्षात चर्चेत राहिली. स्वत: केजरीवाल यांनाही तुरुंगाची हवा खावी लागली. या साऱ्यामध्येच मागील पाच वर्षात दिल्लीकरांना दिलेली आश्वासनांची पुरतात करण्यात आपण कमी पडल्याची कबुली स्वत: केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान दिली. यंदाची निवडणूक ही आपसाठी सर्वात आव्हानात्मक जाणार असं सांगितलं जात आहे.
27 वर्षांहून अधिक काळापासून सत्तेपासून दूर असलेल्या भारतीय जनता पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकद लावल्याचं दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपाचे स्टार प्रचारक होते. एक्झिट पोल्सनेही यंदा भाजपाच दिल्ली काबीज करणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्लीत एकूण 60.54 टक्के मतदान झालं. 94 लाख 5 कोटी दिल्लीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.