International Yoga Day Live: जगभरात भारताची ओळख करून देणारे अनेक संदर्भ आणि वैशिष्ट्य आपण पाहिली. पण, एक गोष्ट तुमच्या लक्षात येतेय का? योगसाधना आणि त्याच्या पाळामुळांचं भारताशी असणारं नातं अतिशय खास आहे. गेल्या कैक शतकांपासून योगसाधनेमुळं अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य झाल्या आहेत. शरीर आणि मनाचा योग्य मेळ साधत केल्या जाणाऱ्या योगाभ्यासामुळं अनेक दुर्धर व्याधींवरही मात करता येते.
अशा या दिवसाचा पाया 2014 मध्ये रचला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये या दिवसाबद्दलचा प्रस्ताव ठेवला आणि हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यामुळं 21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ज्यानंतर दरवर्षी मोठ्या पातळीवर हा दिवस साजरा होत आला आणि योगाभ्यासाचं महत्त्वं जाणून घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच गेली. यंदाच्या वर्षीही असाच उत्साह पाहायला मिळत असून, जगाच्या कोपऱ्यातही योग दिन साजरा होत आहे.