Viral Video : लग्नसोहळा म्हटलं की, वऱ्हाडी आणि वाजंत्र्यांची लगबग, लहानमुलं इथंतिथं पळतानाचे प्रसंग आले. लग्न म्हटलं की पाहुण्यांची पंगत आणि जेवणासाठी लज्जतदार पदार्थही आले. पण, लखनऊमधील एका लग्नसोहळ्यात मात्र जरा वेगळंच किंबहुना कमालीचं भीतीदायक चित्र पाहायला मिळालं. जिथं पाहुणेच नव्हे, तर नवरदेवही जीव मुठीत घेऊन पळताना दिसला.
पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि तरीही इथं सुरु असणारा आरडाओरडा थांबत नव्हता. कारण होतं, या लग्नात शिरलेला एक हिंस्र पाहुणा. अर्थात एक धडकी भरवणारा बिबट्या. जाणून आणि व्हायरल होणारी दृश्य पाहून हैराण व्हाल. पण, हे खरंय.
लखनऊ येथील रहमानखेडा क्षेत्रात वाघाची दहशत असतानाच एकाएकी बुद्देश्वर इथं एमएम मॅरेज लॉन्स इथं बिबट्या घुसला आणि उपस्थितांनी जीव मुठीत घेऊन पळण्यास सुरुवात केली. लग्नसमारंभ सुरु असतानाच हा प्रकार घडल्यानं तिथं बरीच गर्दी पाहायला मिळाली. पण, बिबट्या आल्याचं कळता पाहुण्यांनी भीतीपोटी पळ काढण्यास सुरुवात केली. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा तिथं दाखल होत त्यांनी बिबट्याला भूल देत त्याला जेरबंद केलं.
बुद्देश्वर लॉन इथं बुधवारी अक्षय कुमार आणि ज्योती यांच्या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 10 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास दीपक नावाची एक व्यक्ती लॉनमध्ये असणाऱ्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर गेला असता तिथं त्याला बिबट्या दिसला आणि त्यांना नेमकं काय करावं हेच कळेना. दीपकनं तिथूनच उडी मारली आणि त्यामुळं त्यालाही इजा झाली.
बिबट्या आल्याच कळताच तातडीनं तिथं महिला आणि लहान मुलांना एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आलं आणि वन विभागाला यासंदर्भातील माहिती देण्यात आली. बिबट्या समोर येईल त्याच्यावर हल्ला करण्याच्या स्थितीत असतानाच अनेक प्रयत्नांनंतर त्याला भूल देण्याचं इंजेक्शन मारण्यात यंत्रणेला यश मिळालं ज्यानंतर त्याची दिशाभूल करण्यासाठी हवेत बंदुकीची गोळी झाडण्यात आली. हा आवाज ऐकूनच बिबट्यानं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि जिन्याजवळ येताच त्याला जाळ टाकून पकडण्यात आलं.
➡️#लखनऊ के बुद्धेश्वर क्षेत्र के एक मैरिज लॉन में कल रात घुसे तेंदुए को वन विभाग की टीम ने पकड़ लिया है।
— AIR News Lucknow (@airnews_lucknow) February 13, 2025
➡️तेंदुआ दिखने से पूरे शादी समारोह में दहशत का माहौल बन गया था.. तेंदुए ने वन विभाग के मलिहाबाद रेंज के दारोगा मुकद्दर अली पर हमला करके उन्हें घायल कर दिया था #leopard pic.twitter.com/QzZw8VFcM1
रात्री सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान हा बिबट्या तिथं आलेला असतानाच बचावमोहिमेदरम्यान मध्यरात्र उलटून गेल्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात यश आलं. ज्यानंतर वरपक्षानं यंत्रणेचे आभारही मानले.