Marathi News> भारत
Advertisement

हैदराबादला लँड होण्याऐवजी आकाशातच घिरट्या घालत राहिलं विमान; पुन्हा जर्मनीच्या दिशेनं यू टर्न घेताच चिंतेत भर

Lufthansa flight to Hyderabad returns to Frankfurt: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बोईंग 787 ड्रीमलायनरच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हैदराबादला लँड होण्याऐवजी आकाशातच घिरट्या घालत राहिलं विमान; पुन्हा जर्मनीच्या दिशेनं यू टर्न घेताच चिंतेत भर

Lufthansa flight to Hyderabad returns to Frankfurt: विमानप्रवासासंदर्भातील प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची सध्या बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेदरम्यान आताच लुफ्तान्साच्या विमानासंदर्भातील अशाच वृत्तानं अनेकांचं लक्ष वेधलं.

रविवारी हैदराबादच्या दिशेनं फ्रँकफर्टहून निघालेलं विमान फ्लाइट (LH752) चालू प्रवासातच माघारी वळवण्यात आलं. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार बोईंग 787-9 या विमानानं उड्डाणाच्या काही वेळानंतरच परतीची वाट धरली. दरम्यान हे विमान नेमकं माघारी का नेण्यात आलं याची माहिती मात्र अद्याप समोर येऊ शकलेली नाही.

विमान जिथून निघालं तिथंच परतलं आणि...

माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार हैदराबादला लँड होण्यासाठी निघालेलं लुफ्तान्साचं विमान (LH752) रविवारी सायंकाळी फ्रँकफर्टहून निघालं आणि पुन्हा ते तिथंच परतलं. जर्मनीतील वेळएनुसार रविवारी दुपारी साधारण 2 वाजून 15 मिनिटांनी या विमानाचं उड्डाण झालं. सोमवारी हे विमान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद इथं पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र काही तासांच्या प्रवासानंतरच या विमानानं वेगळं वळण घेतलं आणि ते फ्रँकफर्टला माघारी नेण्यात आलं.

लुफ्तान्साकडून वृत्तसंस्थेला देण्यात आलेल्या माहितीनुसार ‘या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नव्हती. याच कारणास्तव विमान पुन्हा फ्रँकफर्टला वळवण्यात आलं’. दरम्यान या अनपेक्षित यू टर्नची सविस्तर माहिती अद्यापही प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं जात आहे. कथित स्वरुपात या विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानं ते परत बोलवण्यात आलं. मात्र, अद्यापही या धर्तीवर कोणतीही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.

विमानाच्या उड्डाणानंतर एकाएकी त्याची वाट बदलण्यात आल्याची माहिती हैदराबाद येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) पर्यंत पोहोचवण्यात आली. या विमानानं प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यांना सध्या फ्रँकफर्ट येथील हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आलं आहे. सोमवारी हे विमान पुन्हा हैदराबादच्या दिशेनं झेपावेल असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

जागतिक स्तरावर नावाजलेल्या विमानसेवा पुरवणाऱ्या अर्थात लुफ्तान्साच्या विमानासोबत नेमकं काय घडलं याचा पुढील तपास आता सुरू असून भारतीय आणि जर्मन उच्चस्तरिय अधिकारी त्यासाठीची माहिती मिळवत असल्याचं स्पष्ट होत आहे.

Read More