Marathi News> भारत
Advertisement

शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 2 लाख, Oxygen Concentrator साठी दान दिले

भारतातील कोरोनाच्या वेगाने होणार्‍या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून विवाह आणि इतर समारंभाच्या भव्य सोहळ्यावर बंदी घातली गेली आहे. 

शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 2 लाख, Oxygen Concentrator साठी दान दिले

नीमच : भारतातील कोरोनाच्या वेगाने होणार्‍या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून विवाह आणि इतर समारंभाच्या भव्य सोहळ्यावर बंदी घातली गेली आहे. पण यानंतरही असे चित्र समोर आले की, लोकांची समारंभात खूप गर्दी होत आहे, निवडणुकांच्या बैठकींपासून ते इतर समारंभांपर्यंत कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु अशा परिस्थितीत मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने जे केले, ते कदाचीत कोणीही इतक्या सहज करु शकणार नाही.

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील शेतकरी चंपालाल गुर्जर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये जमा केले होते. जे त्यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर (Oxygen Concentrator) मशीन्स खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दान केले आहे. गुर्जर यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश जिल्ह्यातील डीएम मयंक अग्रवाल यांना दिला आहे. जेणेकरुन 2 ऑक्सिजन कंसंट्रेटर विकत घेता येतील.

चंपालाल गुर्जर यांनी सांगितले की, "प्रत्येक बापाचे स्वप्न असते की, त्याच्या मुलीचे लग्न धुम धडाक्यात व्हावे,  मला सुद्धा माझ्या अनिताचे धुम धडाक्यात करायचे होते. तिचे लग्न रविवारी होते, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे हे शक्य झाले नाही."

महामारीने बदलले मन

या कोरोना परिस्थितीने शेवटच्या क्षणी चंपालाल गुर्जर यांचे मत परिवर्तन झाले. ते म्हणाले की, "मी हा निर्णय घेतला, ज्यामुळे माझ्या मुलीच्या लग्नाला लोकं लक्षात ठेवतील." त्याचवेळी अनिता म्हणाली की, "माझ्या पप्पांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा मला खूप आनंद झाला आहे. माझ्या लग्नाच्या खर्चाच्या पैशामुळे रुग्णांचे प्राण वाचतील."

मानवतेचे उदाहरण

शेतकरी चंपालाल यांनी मानवतेचे उदाहरण मांडले आहे आणि त्यासाठी त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. नीमचे डीएम मयंक अग्रवाल यांनी म्हटले आहे की, "सध्या कोविड -19 प्रकरणांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. जर सर्व लोकांनी असा विचार केला तर, ही नक्कीच मोठी मदत होऊ शकते. चंपालाल यांनी दिलेल्या पैशातून ऑक्सिजन कंसंट्रेटर आणले जाणार आहे."

Read More