5 Killed While Trying To Save Cow: मध्य प्रदेशमध्ये एका अत्यंत विचित्र दुर्घटनेमध्ये पाच जणांनी प्राण मगावले आहेत. धरनावदा गावात ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे विहिरीत पडलेल्या एका गाईच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातीत पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून पंचक्रोषीत या विचित्र दुर्घटनेची चर्चा आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धरनावदा गावात असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये मंगळवारी दुपारी गाईचं एक वासरू पडलं. विहिरीत वासरू पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर लोकांनी या वासराला बाहेर काढण्यासंदर्भातील नियोजन सुरु केलं. या वासराला कसं बाहेर काढता येईल? त्यासाठी काय करावं लागेल याबद्दलची तयारी सुरु असतानाच गावातील काही धाडसी तरुण एकापाठोपाठ एक विहिरीत उतरले. दरम्यान, आपण या वासराला सहज बाहेर काढू असे या तरुणांना वाटते होते. मात्र नियतीच्या मनात भलतेच काहीतरी होते.
मागील बऱ्याच काळापासून वापरात नसलेल्या आणि खूप जिर्णावस्थेत असलेल्या या विहिरीमध्ये विषारी वायू भरलेला होता. विहिरीमध्ये विषारी वायू असेल याची कल्पना ना गावकऱ्यांना होती, ना विहिरीत उतरणाऱ्या तरुणांना. त्यामुळेच विहिरीमध्ये खाली उतरलेले तरुण एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडत गेले. असं का होतंय हे कोणाला कळलं नाही.
एका वासराला वाचवण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घेत विहिरीत उतल्यानंतर पुढील काही वेळात येथील परिस्थिती एवढ्या वेगाने बदलली विहिरीच्या कठड्याजवळ बाहेर उभ्या असलेल्या लोकांना बुडणाऱ्या तरुणांच्या मदतीसाठीही काहीच करता आले नाही. वासराला वाचवायला गेलेले तरुण विहिरीत बडल्याची वार्ता संपूर्ण गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि बचाव पधकाने धाव घेतली. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर, दोऱ्या आणि इतर उपकरणांसहीत मदत कार्य सुरू केते. मात्र विहिरीत भरलेल्या विषारी वायूमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. मदत कार्यामध्ये स्थानिकांकडूनही सहकार्य मिळत होतं. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत पाच तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
अशाप्रकारे जलस्रोतांमध्ये पुरेशी माहिती न घेता उतरल्यास जीवाला धोका संभवू शकतो असं यापूर्वीही अनेक घटनांमधून समोर आलं आहे. मात्र पुरेसं ज्ञान नसल्याने या मुलांना प्राण गमावावा लगाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व मयत हे 25 ते 30 वयोगटातील आहेत.