Marathi News> भारत
Advertisement

#MahaShivratri शंभो शंकरा! देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह

शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा  

#MahaShivratri शंभो शंकरा! देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह

नवी दिल्ली :  #MahaShivratri #MahaShivRatri2020 महाशिवत्रीचा उत्सव आज म्हणजेच शुक्रवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या खास दिवसाचं औचित्य साधत भाविकांची वाट ही थेट महादेवाच्या दर्शनासाठी शिवमंदिरांकडे वळली आहे. 

'बम बम भोले' आणि 'हर हर महादेव'च्या गजरात शिवभक्त आपल्या आराध्य दैवताचं दर्शन घेत आहेत. भोलेनाथाच्या बारा ज्योतीर्लिगांच्या ठिकाणीही भाविकांची प्रचंड लांबच लांब रांग दिसत आहे. शिवपिंडीवर भक्तांकडून दुग्धाभिषेक केला जात आहे. शिवभक्तांना दर्शन सहज आणि सुलभ व्हावं यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. तसंच पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला आहे. या प्रवेशव्दारातील फुलांची सजावट भाविकांना आकर्षक करतेय. 

वाराणसीमधील महाशिवरात्रीचं अनेकांनाच खास आकर्षण. याच आकर्षणाला सार्थ ठरवत आहे ते म्हणजे येथील प्रसन्न वातावरण. गुरुवारी रात्रीपासूनच भाविकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली. अनेकांनी पवित्र गंगा नदीत स्नान केलं. तर, अनेकांनी शिवलींगाचा अभिषेक केला. काशीविश्वनाथाच्या दर्शनासाठी रात्रीपासून लांबच लांब रांगा लावत आपली भक्तिसुमनं अर्पण करण्याचीच भावना प्रत्येकाच्या मनात होती. यावेळी भोलेनाथाच्या नामाचा जयघोष करत भाविक शंकराचं दर्शन घेत आहेत.  

दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भाविक मोठ्या संख्येनं वाराणसीत येत असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली, अमृतसर येथेसुद्धा महाशिवरात्रीनिमित्त विविध पुरातन शिवमंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Read More