Mamata Banerjee On Waqf Amendment Act: सध्या देशात वक्फ (दुरुस्ती) कायद्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. या कायद्यावरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल करतायत. सत्ताधारी एनडीए मुस्लिमांना बाजूला ठेवत असल्याचा आरोप केला जातोय. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठं विधान केलंय. राज्यात वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू केला जाणार नाही, असे विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने केले. अल्पसंख्याक आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण केले जाईल, असे कोलकाता येथे जैन समुदायाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या.
'तुम्ही वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीवर नाराज आहात, हे मला माहिती आहे. पण विश्वास ठेवा कोणीही विभाजन करून राज्य करू शकेल असे बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही. चिथावणी देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना केले.
मंगळवारी वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरून मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात केला. 'बांगलादेशच्या सीमावर्ती भागातील परिस्थिती पहा. हे विधेयक यावेळी मंजूर व्हायला नको होते. बंगालमध्ये 33 टक्के अल्पसंख्याक आहेत. मी त्यांचे काय करावे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये झालेल्या जोरदार चर्चेदरम्यान 3 एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर करण्यात आले. यानंतर राज्यसभेनेही या विधेयकाला हिरवा कंदील दाखवला. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी या विधेयकाला मान्यता दिली.
ममता बॅनर्जी यांनी अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली. 'इतिहास आपल्याला सांगतो की बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हे सर्व एकत्र होते. फाळणी नंतर झाली आणि इथे राहणाऱ्यांना सुरक्षा पुरवणे हे आपले काम असल्याचे' त्या यावेळी म्हणाल्या.
'जर लोक एकत्र उभे राहिले तर ते बरेच काही साध्य होऊ शकते. काही लोक तुम्हाला एकत्र येऊन आंदोलन सुरू करण्यास उद्युक्त करतील. पण मी तुम्हा सर्वांना आवाहन करेन की हे करू नका. कृपया लक्षात ठेवा की जेव्हा दीदी (बॅनर्जी) इथे असतील तेव्हा त्या तुमचे आणि तुमच्या मालमत्तेचे रक्षण करतील. आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे', असे मुख्यमंत्री ममता यांनी म्हटले. कार्यक्रमात सीएम बॅनर्जी यांनी धार्मिक सलोखा वाढवण्यास आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले. 'मी सर्व धर्मांच्या स्थळांना भेट देते आणि पुढेही देत राहीन. जरी तुम्ही मला गोळी मारली तरी तुम्ही मला एकतेपासून वेगळे करू शकणार नाही, असे त्या यावेळी म्हणाल्या. दुर्गा पूजा, काली पूजा, जैन आणि बौद्ध मंदिरे, गुरुद्वारा, चर्च आणि गुरु रविदास मंदिर यासह विविध धार्मिक स्थळांना दिलेल्या भेटींचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.राजस्थानमध्ये मी अजमेर शरीफ तसेच पुष्करमधील ब्रह्मा मंदिराला भेट दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.