बिहारमध्ये एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे रुग्णालयात घुसून पाच जणांनी एका रुग्णाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाच हल्लेखोर रुग्णालयात शिरले, नंतर सहजपणे रुग्णाच्या रुममध्ये गेले आणि गोळ्या घालून पळ काढला. या घटनेनंतर बिहारमधील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत पाचही आरोपी गोळ्या घातल्यानंतर पळून जाताना दिसत आहेत. पीडित चंद्रन मिश्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिश्रा हा एक कट्टर गुन्हेगार असून त्याच्यावर डझनभर खूनाचे गुन्हे दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव त्याला पॅरोल मिळाला होता. त्याला पाटण्याच्या पारस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे आज सकाळी गोळीबार झाला. या भयानक हल्ल्यामागे प्रतिस्पर्धी टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक कार्तिकय शर्मा यांनी गोळीबारानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "बक्सर जिल्ह्यातील रहिवासी चंदन मिश्रा नावाचा एक गुन्हेगार, ज्याच्याविरुद्ध खूनाचे डझनभर गुन्हे दाखल आहेत, त्याला बक्सरहून भागलपूर तुरुंगात हलवण्यात आलं. चंदन पॅरोलवर होता आणि त्याला उपचारासाठी पारस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रतिस्पर्धी टोळीने त्याच्यावर गोळीबार केला. बक्सर पोलिसांच्या मदतीने आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. चंदन शेरू टोळीच्या सदस्यांची ओळख पटवली जात आहे". या घटनेत रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सहभागी होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
This isn't a movie , this happened today in Paras hospital, Patna !
— With Love Bihar (@WithLoveBihar) July 17, 2025
pic.twitter.com/HP5KXKbwQf
गेल्या काही आठवड्यात हत्येच्या अनेक घटना घडल्याने बिहारची राजधानी चर्चेत आली आहे. रुग्णालयातील गोळीबारामुळे पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये व्यापारी गोपाळ खेमका, भाजपा नेते सुरेंद्र केवट आणि वकील जितेंद्र महातो यांचा समावेश आहे.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू-भाजप सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. रुग्णालयात झालेल्या गोळीबारानंतर, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी बिहार सरकारला राज्यात कोणीही कुठेही सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला आहे. "सरकार समर्थित गुन्हेगारांनी आयसीयूमध्ये घुसून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णावर गोळीबार केला. बिहारमध्ये कुठेही कोणी सुरक्षित आहे का? 2005 पूर्वी हे घडले आहे का?", असंही त्यांनी विचारलं आहे.
उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी गुन्हेगारांना पकडलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. "ही घटना दुर्दैवी आहे. त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगाराला पकडले जाईल आणि कडक शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे," असं त्यांनी सांगितलं.