Marathi News> भारत
Advertisement

महिला कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार मासिक पाळीची सुट्टी, भारतातील मोठ्या कंपनीचा ऐतिहासिक निर्णय!

Menstrual Leave: महिला दिनापूर्वी एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी  घोषणा केली आहे.

महिला कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार मासिक पाळीची सुट्टी, भारतातील मोठ्या कंपनीचा ऐतिहासिक निर्णय!

Menstrual Leave: तुम्ही भारतातील प्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रो म्हणजेच एल अँड टीचे नाव ऐकले असेल. ही कंपनी औद्योगिक तंत्रज्ञान, अवजड उद्योग, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन, वीज, माहिती तंत्रज्ञान, लष्करी आणि वित्तीय सेवा यासारख्या क्षेत्रात काम करते. या कंपनीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. ज्याचे विशेष करुन महिला वर्गातून कौतुक केलं जातंय. लार्सन अँड टुब्रोने  महिला कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. एल अँण्ड टीमध्ये काम करणाऱ्या महिलांना दरमहा एक दिवस मासिक पाळीची रजा मिळणार आहे.

महिला दिनापूर्वी एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी  घोषणा केली आहे. मुंबईतील त्यांच्या पवई कार्यालयात 350 महिला कर्मचाऱ्यांमध्ये ही घोषणा केली. एल अँड टीमध्ये एकूण 60 हजार कर्मचारी आहेत. यापैकी साधारण 5 हजार महिला आहेत. म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी 9% महिला आहेत.टाईम्स ऑफ इंडियामध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.मासिक पाळीच्या रजेची ही सुविधा फक्तमॅन्यूफॅक्चरिंग आणि कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीशी संबंधित महिला कर्मचाऱ्यांसाठी आहे. एल अँड टीच्या इतर सर्व व्यवसायांमध्ये किंवा वर्टिकलमध्ये काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा नसेल, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. कारण त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना घरून काम करण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे. एल अँड टीच्या मुख्य कार्यालयांत काम करणाऱ्या महिलांना ऑफिसमध्ये येऊन काम करणे अनिवार्य आहे.

सुब्रमण्यम यांच्या विधानामुळे उडाला होता गोंधळ 

एल अँड टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वी आठवड्यातून 90 तास काम करण्यासंदर्भात विधान केले होते. रविवारीही काम करायला हवे पण तसे शक्य नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हे विधान खूपच वादग्रस्त ठरले. विविध क्षेत्रातील प्रमुखांनी या विधानावर टीका केली. आता सुब्रमण्यम यांच्या नवीन घोषणेमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी

वर्षातून 12 दिवसांच्या मासिक पाळीच्या रजेचे धोरण कसे अंमलात आणले जाईल? सध्याच्या सुट्टीपेक्षा ही अतिरिक्त सुट्टी असेल की नाही?महिलांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी ही रजा घेता येईल का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

इतर कंपन्यांसाठी उदाहरण

ज्या महिलांना पिरियड्सच्या दिवसात शारीरिक अस्वस्थता जाणवते त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे दिलासा मिळाला आहे. कंपनी हे धोरण कसे अंमलात आणते आणि त्याचा महिला कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. कारण एल अॅण्ड टी कंपनीने उचललेले हे पाऊल भविष्यात इतर कंपन्यांसाठीही एक उदाहरण बनू शकते. इतर कंपन्यांनीही त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी असेच धोरण बनवावे. महिलांसाठी कामाचे जीवन सोपे करण्याच्या दिशेने हे एक चांगले पाऊल असू शकते, असे म्हटले जात आहे.

Read More