Marathi News> भारत
Advertisement

'ऑपरेशन शील्ड' होणारच! 31 मे रोजी काश्मीरपासून गुजरातपर्यंत भोंगे वाजणार, ब्लॅकआऊटही होणार

Mock Drill Operation Shield : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यामध्ये असणाऱ्या संघर्षादरम्यानच सीमाभागात होणारे घुसखोरी प्रयत्न आणि त्या धर्तीवर नागरिकांना सतर्क करण्यासाठी यंत्रणांनी पुन्हा कंबर कसली आहे.   

'ऑपरेशन शील्ड' होणारच! 31 मे रोजी काश्मीरपासून गुजरातपर्यंत भोंगे वाजणार, ब्लॅकआऊटही होणार

Mock Drill Operation Shield : सीमाभागात शत्रूकडून सातत्यानं होणारी घुसखोरी, तणावाची परिस्थिती आणि अटीतटीचा प्रसंग अशा वेळी यंत्रणा आपली कामं करत असतानाच सामान्य नागरिकांनी नेमकं काय करणं अपेक्षित असतं याचं उत्तप मात्र अनेकांकडे नसतं. याच प्रश्नाचं उत्तर देत नागरिकांनाही काही महत्त्वाच्या प्रसंगांच्या दृष्टीकोनातून सतर्क राहण्यासाठीच्या सूचना आणि त्यांच्याकडून अपेक्षित कृती याची माहिती देण्यासाठी 'ऑपरेशन शील्ड' राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची टळलेली तारीख आता पुन्हा एकदा नव्यानं समोलर आली असून, 31 मे 2025 ला जम्मू काश्मीरपासून ते अगदी पंजाब आणि गुजरातपर्यंत मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. 

युद्धजन्य किंवा तत्सम परिस्थितीमध्ये यंत्रणेला सहकार्य करत नागरिकांनी नेमकं काय करावं याचीच माहिती या मॉक ड्रीलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरआधीसुद्धा भारतात अशाच मॉक ड्रीलची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याआधीच भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. 

देशातील कोणत्या राज्यांमध्ये होणार मॉक ड्रील? 

यावेळी संपूर्ण देशात नव्हे, तर देशातील सीमावर्ती राज्यांमध्ये मॉक ड्रील होणार असून यामध्ये जम्मू काश्मीर, गुजरात, पंजाब आणि राजस्थानात हे मॉक ड्रील घेतलं जाणार आहे. याअंतर्गत सायरन वाजवण्यापासून ब्लॅकआऊटपर्यंतची प्रात्यक्षिकंही घेतली जाणार आहेत. 

मॉक ड्रीलदरम्यान नेमकं काय काय होणार? 

- सिविल डिफेंस वॉर्डन, स्वयंसेवक, स्थानिक प्रशासन आणि एनसीसी , एनएसएस, एनवायकेएस, स्काऊट्स आणि गाईड्स यांचा या मोहिमेत सहभाग असेल. 
- शत्रूनं हवाई किंवा इतर कोणत्या प्रकारचा हल्ला केल्यास तिथं नेमकं कशी प्रतिक्रिया द्यावी याचं प्रशिक्षण
- वायुदल किंवा सिविल डिफेंस नियंत्रण कक्षांमध्ये हॉटलाईन किंवा रेड लाईन संकेतांच्या सक्रियतेचं परीक्षण 
- चिन्हीत अतिसंवेदनशील क्षेत्र आणि ठिकाणी पूर्ण ब्लॅकआऊट (15 मिनिटं). यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात यावं
- स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं 20 जखमींना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं प्रशिक्षण 
- मोठ्या संकटसमयी जखमींच्या वाढत्या संख्येत वैद्यकिय गटांची तैनाती आणि 30 युनिट रक्ताची व्यवस्था करण्याचं प्रशिक्षण 
- सीमा गृह रक्षक दलांच्या तुकड्यांची तैनाची आणि त्वरित संचलनाचा अभ्यास. 

मॉक ड्रील म्हणजे काय? 

मॉक ड्रील हा एक प्रकारचा असा अभ्यास आहे जिथं नागरिकांना आपात्कालिन प्रसंगांसाठी तयार केलं जातं. आग, भूकंप, पूर, वैद्यकीय आपत्ती, मानवनिर्मित संकटं, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करत नागरिकांना प्राथमिक सुरक्षितता आणि बचावाच्या निकषांची माहिती दिली जाते.  

Read More