Marathi News> भारत
Advertisement

भोंगे वाजणार इतक्यातच... मॉक ड्रीलला तूर्तास स्थगिती; 'ऑपरेशन शील्ड'ची नवी तारीख लवकरच होणार जाहीर

Mock Drill : मॉक ड्रील होणार याच वृत्तानं पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात अनेक शंकांनी डोकं वर काढलं आणि एकाएकी मॉक ड्रीलच स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली...   

भोंगे वाजणार इतक्यातच... मॉक ड्रीलला तूर्तास स्थगिती; 'ऑपरेशन शील्ड'ची नवी तारीख लवकरच होणार जाहीर

Mock Drill : गुरुवारी (29 मे 2025 रोजी) केंद्र सरकारनं सिविल डिफेंस अभ्यास अंतर्गत घेतलं जाणारं मॉक ड्रील काही प्रशासकिय कारणांनी स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं. सर्व संरक्षण यंत्रणा आणि संबंधित विभागांना यासंदर्भातील कल्पना देण्यात आली असून, सीमावर्ती भागांतील राज्यांमध्ये होणारं हे मॉक ड्रील स्थगित झाल्याच्या सूचना जारी करण्यात आल्या. शिवाय ऑपरेशन शील्डसंद्रभातील नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असंही यंत्रणांनी स्पष्ट केलं. 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार 29 मे रोजी गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि चंदीगढसह काही केंद्र शासित प्रदेशांमध्येही मॉक ड्रील होणार होती. मात्र आता ती स्थगित करण्यात आली आहे. या निर्णय़ानंतर जम्मू काश्मीरमधील 20 जिल्यांमध्येही मॉक ड्रीलसाठीच्या तयारीला स्थगिती गेण्यात आली. शिवाय राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढसह इतर भागांमध्येही मॉक ड्रील आणि ब्लॅकआऊटचे सराव निर्देश मागे घेण्यात आले. 

गुजरात आणि राजस्थानमधील यंत्रणांनीसुद्धा मॉक ड्रील रद्द झाल्याच्या वृत्तांना दुजोरा दिला. सदर मॉक ड्रील सरावाअंतर्गत हवाई हल्ला, ब्लॅकआऊट, आपात्कालिन निकास, वैद्यकीय मदत अशा निकषांच्या आधारे सराव केला जाणार होता. कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगी नागरिकांना त्यांच्या भूमिकेचं भान असावं आणि प्रशासकीय यंत्रणाही अशा प्रसंगांसाठी सज्ज असाव्यात या दृष्टीकोनातून हे मॉक ड्रील घेतलं जातं. यावेळी मात्र मॉक ड्रीलसाठीची तयारी झालेली असतानाही प्रत्यक्ष वेळेच्या काही तास आधीच ते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानं आता यासाठी पुढं कोणती तारीख निश्चित केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

दरम्यान, याआधी केंद्र शासनाच्या वतीनं 7 मे रोजी देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रीलची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याआधीच भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि संपूर्ण यंत्रणेचं लक्ष भारत- पाकिस्तान संघर्षावर केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळालं. याच कारणास्तव यावेळीसुद्धा मॉक ड्रीलची घोषणा होताच त्यासंदर्भात बऱ्याच चर्चांनीही जोर धरला होता. 

 

Read More