उर्वशी खोनासह दिलीप राठोड झी 24 तास मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे. संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरु झालंय. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. संभाव्य हवाईहल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉकड्रिल अत्यंत महत्वाचे मानले जाते.
भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय. पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार.... अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाययोजना कराव्या यासाठी बुधवारी देशभरात रंगीत तालीम होणार आहे. या मॉकड्रिलमधून नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन्स सक्रिय केले जाणार
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण देणार
रात्रीच्यावेळी शत्रूला महत्वाची ठिकाणं समजू नये म्हणून ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार
महत्वाचे कारखाने शत्रूला दिसू नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील
बचावकार्याचं सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा
याच्या मार्गशक सूचना देण्यात येतील
प्रशिक्षणाअभावी 1971च्या युद्धात लोकांचा नाहक बळी गेल्याची आठवणही संरक्षणतज्ज्ञांनी करुन दिली आहे. नुकताच युक्रेनवर हल्ला झाल्यावेळीही तिथल्या मेट्रो स्टेशनचा वापर बंकर म्हणून करण्यात आला होता. भारतातील भूमिगत रेल्वे स्टेशनचा वापरही बंकर म्हणून करण्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय नागरिकांतही युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्याची मानसिकता तयार होणार आहे.