Rahul Gandhi on Operation Sindoor: लोकसभेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर आव्हान दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा आम्ही युद्ध थांबवलं आहे असं म्हटलं. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावं की ते खोटं बोलत आहेत असं आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे. यावेळी त्यांनी लष्कराच्या वापरासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचं सांगितलं आहे.
"भारत सरकारने चूक केली आहे. आपलं कोणासोबत तरी भांडण झालं आणि आपण त्यांना सांगतो की आता ठीक आहे, आम्हाला लढाई नको आहे. आम्ही तुम्हाला एकदा कानाखाली मारली आहे, आम्ही तुम्हाला पुन्हा कानाखाली मारणार नाही. चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. ट्रम्प यांनी 29 वेळा आम्ही युद्ध थांबवलं आहे असं म्हटलं. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर ते खोटं बोलत आहेत असं सभागृहात सांगातवं. जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या 50 टक्केही हिंमत असेल तर ते येथे सांगावे. खरोखरच हिंमत असेल तर पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत हे येथे सांगावे," असं आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे.
पुढे ते म्हणाले की, "एक नवीन गोष्ट सध्या सुरु आहे, एक नवीन शब्द वापरात आला आहे तो म्हणजे न्यू नॉर्मल. परराष्ट्रमंत्र्यांनी येथे तो वापरला. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की सर्व इस्लामिक देशांनी त्याचा निषेध केला आहे, परंतु पहलगामनंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही हे त्यांनी सांगितले नाही. प्रत्येक देशाने दहशतवादाचा निषेध केला".
राहुल गांधी म्हणाले की, "कालच सॅम माणेकशॉ यांचा उल्लेख करण्यात आला. सॅम माणेकशॉ यांनी इंदिराजींना सांगितलं होतं की, आपण सध्या ऑपरेशन करू शकत नाही. आपल्याला सहा महिन्यांचा वेळ हवा आहे, आपण उन्हाळ्यात ते करू. इंदिराजींनी पूर्ण वेळ दिला होता".
"संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की 1.35 वाजता आम्ही पाकिस्तानला सांगितले की आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. तुम्ही फक्त 30 मिनिटांत पाकिस्तानसमोर आत्मसमर्पण केलं. यावरून असे दिसून आले की तुमच्यात लढण्याची इच्छाशक्ती नाही. सरकारने वैमानिकांचे हातपाय बांधले होते," असा आरोपही त्यांनी केला.