Sanjay Raut Slams Modi-Amit Shah: "भारतीय जनता पक्ष आणि त्याची विचारधारा ही स्वातंत्र्यानंतर उदयास आली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात संघ विचाराचे लोक नव्हते व भाजप जन्मास आला नव्हता. त्यामुळे महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याविषयी आजच्या मोदी भाजपमध्ये द्वेष दिसत आहे," असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. "संसदेत पहलगाम हल्ला, `ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा झाली, पण चर्चेत काय दिसले? पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री शहा, विदेश मंत्री जयशंकर, भाजपचे अध्यक्ष नड्डा या सगळ्या `महान' नेत्यांनी पहलगाम हल्ल्याचे खापर पंडित नेहरूंवर फोडले. ही त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे," असा घणाघात राऊतांनी केला आहे.
"भारत-पाक युद्धात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. हेसुद्धा पंडित नेहरूंमुळेच झाले, असे मोदी, जयशंकरसारखे लोक संसदेत सांगत राहिले. नेहरू यांचे निधन होऊन 60 वर्षे होऊन गेली. नेहरूंनंतर अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, व्ही.पी. सिंग व आता तब्बल 11 वर्षे मोदी हे देशावर राज्य करीत आहेत. नेहरूंच्या चुका दुरुस्त करण्यासाठी हे महान लोक अपयशी का ठरले?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
"मोदी यांना ज्ञान-विज्ञानाचा तिटकारा आहे. पैसे, खोटेपणा आणि अत्युच्च दर्जाची बनियेगिरी या सामर्थ्यावर ते पंतप्रधान झाले. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले व देशाच्या सामाजिक, राजकीय चळवळीत योगदान नसलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. नेहरूंच्या तुलनेत मोदी-शहा वगैरे लोक धूलिकणांच्या क्षमतेचे नाहीत. नेहरूंचे नाव वारंवार घेऊन आपले गुन्हे आणि अपयश झाकणे हे योग्य नाही, पण मोदींकडे दुसरा पर्याय नाही," असं राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरात म्हटलं आहे.
"मोदी यांनी काय केले? नेहरूंची उंची झाकण्यासाठी अहमदाबादेत सरदार पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभा केला, पण तो पुतळाही गळू लागला व शेवटी झाकून ठेवावा लागला (सरदार पटेलांनाही मोदींचे राजकारण रुचले नाही). `ऑपरेशन सिंदूर'च्या चर्चेत मी राज्यसभेत सरदार पटेल आणि नेहरूंचा विशेष संदर्भ दिला. भारतीय जनता पक्षाच्या `ट्रेझरी' बाकावरील लोकांना पंडित नेहरू जगू देत नाहीत आणि झोपू देत नाहीत. सरदार पटेल यांच्या आठवणीनेही ते व्याकूळ होतात. काँग्रेसच्या माझ्या सहकाऱ्यांनी काय करायचे? काँग्रेसने एक ऐतिहासिक चूक केली आहे ती म्हणजे सरदार पटेल यांना पंतप्रधान न करण्याची. सरदार पटेल यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालून कठोर कारवाई केली होती," असं राऊत म्हणाले.
"सरदार साहेब खरेच पंतप्रधानपदी बसले असते तर त्यांनी संघावर कायमची बंदी घातलीच असती व आजचा भाजप जो सत्तेवर बसलेला दिसतोय, तो उखडून तेव्हाच फेकला असता. तुम्ही इथे दिसलाच नसता, पण पटेल अकाली गेले व लोकशाहीवादी नेहरूंनी संघावरील बंदी उठवून जीवदान दिले. नेहरू हे `लिबरल' होते. विचारांची लढाई विचाराने लढणारे होते. भाजप नेहरूंच्या चुका रोज काढतो. त्यासाठी बहुधा त्यांनी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याचे दिसते. पण नेहरूंची एकच घोडचूक देशाला महाग पडत आहे ती म्हणजे संघावरील बंदी उठवण्याची. मोदी, शहांसारख्या लोकांनी ज्याप्रकारे धर्मांध राजकारणाचा उच्छाद व गलिच्छ राजकारणाची सुरुवात केली त्यास आजचा संघ जबाबदार आहे," असा घणाघात राऊतांनी केला आहे.