Sanjay Raut Slams PM Modi: "मोदी वगैरे लोकांना कोणतीच विचारसरणी नाही. ते एक अशिक्षित, गावंढळ व पुढे पुढे करण्यात आनंद मानणारे नेतृत्व आहे. त्यांना इतिहासाचे भान नाही. नेहरू हे विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यानंतरचे नेहरूंचे कार्य सगळ्यांनाच माहीत आहे; पण स्वातंत्र्याच्या चळवळीतले नेहरूंचे महत्त्वाचे योगदान म्हणजे काँग्रेसला त्यांनी आंतरराष्ट्रीय दृष्टी दिली," असं खासदार संजय राऊत यांनी आपल्या विशेष लेखात म्हटलं आहे.
"नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला जो आंतरराष्ट्रीय संदर्भ निर्माण केला, त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर नेहरू, टिटो आणि नासर यांनी निर्माण केलेली गटनिरपेक्षतेची चळवळ आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभावी ठरली. सत्य, अहिंसा, हिंदू-मुस्लिम ऐक्य, खादी, नई तालीम, ग्रामोद्योग, हरिजनोद्धार यांसारख्या महात्मा गांधींच्या अनेक कल्पना स्वातंत्र्यानंतर लोप पावत गेल्या व लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, आत्मनिर्भरता, नियोजन व गटनिरपेक्षता या नेहरूंच्या सहा कल्पना प्रभावी ठरल्या. आर्थिक समता आणि सामाजिक न्याय नसेल तर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही ही विचारसरणी नेहरूंमुळेच काँग्रेसमध्ये तयार झाली," असं राऊत यांनी 'सामना'तील 'रोखठोक'च्या सदरामध्ये म्हटलंय.
"स्वातंत्र्य म्हणजे केवळ गोऱ्या अधिकाऱ्यांच्या जागी हिंदी अधिकारी आणणे असे होत नाही, असे प्रतिपादन प्रथम नेहरूंनीच केले. नियोजनाशिवाय समाजवाद आणता येणार नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या आग्रहामुळेच काँग्रेसने 1938 मध्येच सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समिती नेमली आणि नियोजनाचा आराखडा तयार केला. मोदी, शहांच्या भाजपला हा इतिहास समजणे अवघड आहे," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
नक्की वाचा >> 'मोदी, शहांच्या धर्मांध राजकीय उच्छादाला संघच जबाबदार', राऊतांचा घणाघात; 'नेहरूंची एकच घोडचूक..'
"आजचा भाजप पंडित नेहरूंवर सातत्याने हल्ले करत आहे. हे हल्ले करण्याचे स्वातंत्र्य त्यांना पंडित नेहरूंमुळेच मिळाले. सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस (मोदींचे सोयिस्कर हीरो) हे पंतप्रधान झाले असते तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाळेमुळे मुळापासून उखडली असती. त्यामुळे भाजप कधीच दिसला नसता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी भाजप मान्य करीत असेल तर एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे भाजप, संघ कधीच आधुनिकतेचा पुरस्कार करणारे नव्हते. हे आजच्या त्यांच्या कारवायांवरून दिसतं," अशी टीका राऊतांनी केली आहे.
"व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादा आणि आर्थिक समानतेची आवश्यकता पंडित नेहरूंनी ओळखली तेवढी संघ विचाराच्या, हिंदू महासभेच्या लोकांनी ओळखली नव्हती. त्यामुळे भारतावर इंग्रजांचे राज्य आले काय, राहिले काय याबाबत त्यांना काहीच सोयरसुतक नव्हते. 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला, पण संघाने घेतला नाही," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "1942 च्या `भारत छोडो' आंदोलनाच्या वेळी हेडगेवार यांनी मध्य प्रदेशच्या त्या वेळच्या इंग्रज राज्यपालाला 'संघ या चळवळीत भाग घेणार नाही' असे आश्वासन दिले. 1942 च्या चळवळीत अटल बिहारी वाजपेयी यांनी भाग घेतला, परंतु 'मी या चळवळीतून अंग काढून घेत आहे' असे विधान माजिस्ट्रेटपुढे त्यांनी केले होते. संघातील काही तरुणांनी 1942 च्या चळवळीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावर सरसंघचालक गोळवलकर गुरुजी भडकले व गुरुजींनी त्या स्वयंसेवकांना शिस्तभंगाची शिक्षा काय दिली तर त्यांना इंग्रजांच्या सैन्यात दाखल होण्याचे आदेश दिले. 1944 ला पुण्यात अरण्येश्वर येथे भरलेल्या संघाच्या शिबिरात गोळवलकर गुरुजींनी कहर केला. 1942 च्या `भारत छोडो' चळवळीची थट्टा केली. ते म्हणाले की, 'कसला `भारत छोडो'? एक वाऱ्याची झुळूक आली, दोन-चार झाडे पडली, यापेक्षा 1942 मध्ये विशेष काही घडले नाही' हा इतिहास आहे," असा उल्लेख राऊतांच्या लेखात आहे.
"पंडित नेहरूंचाही स्वातंत्र्य लढ्याचा, त्यासाठी तुरुंगात जाण्याचा, राष्ट्राला स्वत:ची संपत्ती दान करण्याचा, भारताला आधुनिकतेकडे नेण्याचा इतिहास आहे. मोदी व त्यांचा भाजप नेहरूंचे चीनविषयक धोरण, तेव्हाचा कश्मीर प्रश्न यावर आजही धुरळा उडवीत आहेत. पण 11 वर्षांच्या सत्तेत मोदी व त्यांचे लोक जे `सुख' भोगत आहेत ते जवाहरलाल नेहरूंमुळे!" असं राऊत यांनी म्हटलं आहे.
"नेहरूंचा द्वेष करणे सोपे आहे, पण नेहरू बनणे कठीण आहे. ईव्हीएम घोटाळा, पैशांचा वापर, मतदार यादीतला घोटाळा यामुळे मोदी-शहा बनणे सोपे आहे, पण नेहरू कुणालाच बनता येणार नाही. मोदीकृत भाजपचे हे दु:ख समजून घेतले पाहिजे," असा शाब्दिक चिमटा राऊतांनी लेखाच्या शेवटी काढला आहे.