Mukesh Ambani On Reliance Jio: रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे उद्योगपती (Businessmen) आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. अंबानी यांच्या श्रीमंतीचा थाट माट त्यांच्या घरावरुन पहायला मिळतो. मुंबईत अंबानी यांचे 27 मजली घर आहे. हे घर नेहमीच चर्चेच असते. उद्योगपती मुकेश अंबानी हे देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत. ब्लूमबर्गच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 105 अब्ज डॉलर्स आहे. उद्योग क्षेत्रात मुकेश अंबानी यांना अनेकदा रिस्क घ्यावी लागते. पण यातील सर्वात मोठी जोखीम त्यांनी केव्हा घेतली होती? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मुकेश अंबानींनीच याबद्दल खुलासा केलाय.
2016 मध्ये रिलायन्स जिओसोबत टेलिकॉम उद्योगात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम असल्याचे वर्णन मुकेश अंबानींनी केले आहे. या निर्णयानंतर विश्लेषकांनी अंबानींच्या आर्थिक अपयशाची भाकित केली होती. असे असले तरी भारताचे डिजिटल रूपांतर करण्यात अंबानींची ही भूमिका महत्वाची ठरली.
जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी 'मॅककिन्से अँड कंपनी' ला मुकेश अंबानी यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. 'रिलायन्स इंडस्ट्रीजने 4G मोबाइल नेटवर्क लाँच करण्यासाठी स्वतःचे अब्जावधी डॉलर्स गुंतवले आहेत. काही विश्लेषक म्हणत होते की ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकत नाही. कारण भारत सर्वात प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही. पण मी माझ्या संचालक मंडळाला सांगितले की सर्वात वाईट परिस्थिती अशी असेल की आपल्याला फारसा 'परतावा' मिळणार नाही. म्हणून ते ठीक आहे. कारण ते आपले स्वतःचे पैसे आहेत. पण रिलायन्स म्हणून हे भारतातील आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे परोपकारी काम असेल. कारण आपण भारताचे डिजिटलायझेशन करून देश पूर्णपणे बदलून टाकला असेल', असे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी म्हणाले.
2016 मध्ये जिओ लाँच झाल्यापासून जिओने मोफत 'व्हॉइस कॉल' आणि अत्यंत कमी किमतीचा डेटा देऊन भारतीय टेलिकॉम बाजारपेठेत क्रांती घडवून आणली. ज्यामुळे जियोने आपल्या स्पर्धकांना किंमती कमी करण्यास भाग पाडले. देशभरात जलद डिजिटल स्वीकारण्यास सुरुवात झाली. जिओच्या आगमनापूर्वी भारतात मोबाइल इंटरनेट तुलनेने महाग होते आणि लोकसंख्येच्या मोठ्या भागाला ते उपलब्ध नव्हते. पण जियोच्या आगमनाने किंमतींमध्ये चढ-उतार सुरू झाले ज्यामुळे डेटाची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली. ग्रामीण आणि वंचित भागात राहणाऱ्या लाखो भारतीयांसाठी इंटरनेट प्रवेश परवडणारा झाला.
जिओच्या प्रयत्नांचे परिणाम म्हणजे प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचले. भारतात आता 80 कोटींहून अधिक इंटरनेट यूजर्स आहेत. ज्यामुळे जियो जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनले. यामुळे डिजिटल समावेशनाला गती मिळाली. कारण परवडणाऱ्या डेटामुळे डिजिटल दरी भरून काढण्यास मदत झाली. त्यामुळे ई-कॉमर्स, वित्तीय तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान आणि मनोरंजन यासारख्या डिजिटल सेवांच्या वाढीला चालना मिळाली.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंबानी म्हणाले, 'आम्ही नेहमीच मोठे धोके घेतले आहेत, कारण स्केल आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही आतापर्यंत घेतलेला सर्वात मोठा धोका म्हणजे जिओ. त्यावेळी आम्ही स्वतःचे पैसे गुंतवत होतो आणि मी सर्वात मोठा शेअरहोल्डर होतो. जर ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाले नसते तर आमची सर्वात वाईट परिस्थिती असती कारण काही विश्लेषकांचा असा विश्वास होता की भारत सर्वात प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही'.
रिलायन्स जियो ही आज देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. तिचे 47 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. 5जी, क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सेवांमध्ये जियोची उपस्थिती सतत वाढत आहे.'शेवटी तुम्ही या जगात काहीही घेऊन येत नाही आणि काहीही घेऊन जात नाही. तुम्ही जे मागे सोडता ती एक संस्था आहे', असे ते म्हणाले.