Travel SIP : आम्हाला अमुक आणि तमुक ठिकाणं फिरायची आहेत. आम्हाला संपूर्ण जग फिरायचं आहे.... ही अशी अनेकांचीच स्वप्न असतात. मात्र ती साकार होतातच असं नाही. कारण, ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसेसुद्धा गरजेचे असतात हीच वस्तुस्थिती. असं असलं तरीही साचेबद्ध व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, काही लहानमोठ्या सवयींच्या बळावरी पैशांची जुळवाजुळव करून सहलींसाठीचा खर्च भागवता येतो. जाणून आश्चर्य वाटेल, पण सहलीच्या खर्चासाठीसुद्धा तुम्ही म्युच्यअल फंडची मदत घेऊ शकता.
म्युच्युअल फंडचाच एक भाग असणाऱ्या ट्रॅव्हल एसआयपीच्या मदतीनं तुम्ही प्रवासासाठीचा खर्च भागवू शकता. या गुंतवणूक योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणं अपेक्षित असून, जेव्हाकेव्हा एकादी मोठी सहल करण्याचा तुमचा विचार असेल तेव्हा तुम्ही ही रक्कम वापरू शकता. यासाठी फक्त थोडंथोडकं आर्थिक नियोजन गरजेचं.
समजा पुढील 2 वर्षांमध्ये तुम्हाला युरोप फिरण्यासाठी जायचं आहे आणि तुमची खर्च करण्याची क्षमता आहे 5 ते 9 लाख रुपये, तर तुम्ही दर महिन्याला 15 हजार रुपयांची एसआयपी सुरू करणं फायद्याचं ठरेल. या रकमेवर तुम्हाला वर्षाला महिन्याला 12 ते 13 टक्के व्याजानं परतावा मिळून दोन वर्षांत एक समाधानकारक रक्कम तुमच्याकडे जमा असेल.
पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तुमचा जग फिरण्याचा एक मोठा प्लान असेल तर मात्र तुम्हाला लाँग टर्म इक्विटी फंडमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय अधिक मदत करेल, यामध्ये तुम्लाला मिळणारा परतावा तुलनेनं जास्त असून, यातून एक मोठी रक्कम तुमच्या हातात येईल. मोठी सहल शक्य होत नसल्यानं छोट्या सहलींवरच समाधान मानणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुम्हाला लिक्विड फंड या पर्यायात पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवता येईल.
लक्षात घ्या, प्लॅन्ड व्हेकेशन अर्थात एखाद्या मोठ्या सहलीचा बेत आखत असाल, जिथं खर्च होणं अपेक्षित आहे तर त्यासाठीच्या पैशांची जुळवाजुळव दोन वर्षांपासूनच सुरू करा. यादरम्यान तुम्हाला लहानसहान दौरेसुद्धा करता येतील आणि या प्रक्रियेतून पैसे साठवण्याची सवयही तुम्हाला होईल. काय मग आहे ना कमाल हा हौस भागवणारा ट्रॅव्हल एसआयपीचा प्लान?
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही, गुंतवणूक आणि तत्सम निर्णयांपूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या. )