Earthquake Of Magnitude 4 2 Strikes Leh In Ladakh : म्यानमार आणि भूतान भूकंपाने हादरल्या नंतर 30 मार्च रोजी टोंगा देशात 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. टोंगापासून 1000 किमी अंतरावर भूकंपाचं केंद्र होते. भूकंपाच्या धक्क्यानंतर येथे त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. यानंतर आता भारतातील लडाखला भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचे धक्का जाणवल्यानंतर नागरीक घाबरुन घराबाहेर पडले.
भूकंपामुळे थायलंड-म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला. त्यामागोमग आता भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मंगळवारी संध्याकाळी 5.38 वाजता लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या भूकंपाची माहिती दिली आहे. भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर भारतातील मेघालय आणि इंफाळमध्ये भूकंपांचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मेघालयातील पूर्व गारो हिल्स येथे शुक्रवारी दुपारी 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता खूपच कमी होती, त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. आता भूकंपाच्या धक्क्यांनी लेह, लडाखमधील लोक घाबरले आहेत.
28 मार्च रोजी नेपाळलाही भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याचे धक्के बिहार, सिलिगुडी आणि भारतातील इतर शेजारील भागात जाणवले. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्राने पुष्टी केली की भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून सुमारे 65 किलोमीटर पूर्वेला असलेल्या सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरवकुंडा येथे होते. नेपाळ हा जगातील सर्वात सक्रिय भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. येथे कायमच भूकंपाचा धोका असतो.
म्यानमारमध्ये आतापर्यंत भुकंपात 2 हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 600 लोक जखमी झालेत. तसंच 300 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती म्यानमार सरकारचे प्रवक्ते मेजर जनरल जॉ मिन तुन यांनी दिलीय.