PM Narendra Modi on Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीत कॅबिनेटमधील आपले सहकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं ज्याप्रकारे कौतुक केलं आहे, त्यावरुन अनेक अंदाज लावले जात आहेत. पंतप्रधानाच्या विधानात छुपा अर्थ असल्याचं बोललं जात आहे. नरेंद्र मोदींनी मागील अनेक काळापासून गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या अमित शाह यांचं कौतुक करत ही तर फक्त सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. यावरुनच भाजपामध्ये अंदाज लावला जात आहे की, ही फक्त स्तुती नाही तर गुजरातच्या 60 वर्षीय खासदारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्याचा संकेत आहे. नरेंद्र मोदी 75 वय पूर्ण झाल्यानंतर भाजपातील नियम आणि परंपरेचा मान राखत पद सोडतील अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याची सर्वांना उत्सुकता आहे.
HT ने दिलेल्या वृत्तानुसार, एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मोदींनी अमित शाह यांचा उल्लेख केला. यापूर्वी सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहिलेल्या लालकृष्ण अडवाणींनाही त्यांनी मागे टाकल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. बैठकीशी संबंधित एका व्यक्तीने पंतप्रधानांच्या हवाल्याने सांगितलं की, 'ही फक्त सुरुवात आहे... अजून बराच पल्ला गाठायचा आहे.' भाजपचे दिग्गज नेते अडवाणी यांनी मार्च 1998 ते मे 2004 पर्यंत गृहमंत्रीपद भूषवलं आणि ते या पदावर सर्वात जास्त काळ सेवा करणारे मंत्री बनले. दरम्यान, मे 2019 मध्ये गृहमंत्री झालेले अमित शाह यांनी यापेक्षा जास्त काळ पूर्ण केला आहे.
भाजपाने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "2258 दिवसांच्या कार्यकाळासह, अमित शाह यांनी आता लालकृष्ण अडवाणी यांच्या गृहमंत्रीपदाच्या 2256 दिवसांच्या कार्यकाळाला मागे टाकलें आहे. त्यांच्यापूर्वी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1218 दिवस देशाची सेवा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यकाळ धाडसी आणि ऐतिहासिक निर्णयांनी भरलेला आहे, ज्यामध्ये कलम 370 हटवण्यापासून ते दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यापर्यंत गोष्टींचा समावेश आहे".
पंतप्रधानांचे दीर्घकाळ विश्वासू असलेले अमित शाह यांनी गुजरातमध्ये मोदींसोबत जवळून काम केलं होतं. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. या प्रचाराचा फायदा झाला आणि भाजपाने 80 पैकी 71 जागा जिंकल्या. यानंतर अमित शाह यांचं कौतुक करण्यात आलं. त्याच वर्षी त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. नंतर राजनाथ सिंह यांच्या जागी त्यांना केंद्रीय गृहमंत्री म्हणून बढती देण्यात आली.
रिपोर्टनुसार, एका वरिष्ठ भाजपा नेत्याने सांगितलं की, पंतप्रधानांचे विधान दोन्ही नेत्यांमधील जवळचे संबंध मजबूत करणारे मानले जाऊ शकते. ते म्हणाले की काही लोक पदांसंबंधी मुद्द्यांवर अंदाज लावत होते, परंतु पंतप्रधानांच्या विधानाने या कल्पनेला पूर्णविराम दिला आहे. पण पंतप्रधानांचे संकेत अनेकांच्या मनात गृहमंत्री अमित शाह भविष्यात काय भूमिका बजावू शकतात याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.
HT च्या वृत्तानुसार, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने पंतप्रधानांचा पाठिंबा हा अमित शाह यांच्या क्षमतेची आणि योग्यतेची ओळख आहे. गृहमंत्री म्हणून, ते अंतर्गत दहशतवाद कमी करणं, दहशतवादाच्या निधीला आळा घालणं, जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 कलम हटवणे सारख्या वैचारिक मुद्द्यांना पुढे नेण्यात आघाडीवर राहिले आहेत. ते संघाची विचारसरणी पुढे नेतात आणि त्यांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेत व्यावहारिक आहेत. बैठकीत पंतप्रधानांनी शाह यांचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांना विश्वास आहे की 2026 पर्यंत दहशतवाद संपेल.