Naseeruddin Shah On PM Modi Jibe At Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून मतांची चोरी होत असतानाही निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी एक सविस्तर प्रेझेंटेशन सादर करत आपलं म्हणणं प्रसारमाध्यमांसमोर मांडलं. राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट करताना निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशापद्धतीने बऱ्याच बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा करतं अशा आशयाचं सादरीकरण प्रसारमाध्यमांसमोर करुन दाखवलं. या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाने राहुल गांधींकडे आरोप प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करुन लिहून द्यावेत असं म्हटलं असून भाजपाने हे आरोप फेटाळून लावलेत. मात्र काही प्रसार माध्यमांनी राहुल गांधींनी केलेल्या दाव्यांची पडताळणी केली असता ते खरे आढळून आल्याने या विषयावरुन सध्या गदारोळ सुरु आहे. असं असतानाच ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी या मुद्द्यावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कथित निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध घेतलेल्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'कौन राहुल?' हा टोमणा आता कालबाह्य झाल्याचंही नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. आपल्या बेधडक, स्पष्ट आणि कठोर भूमिकांबरोबरच विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या शाह यांनी सोशल मीडियावरुन व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या माध्यमातून 'मत चोरी' होत असल्याचा दावा करताना ही माहिती समोर आणण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचं कौतुक नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, एका मुलाखतीत प्रश्नाला उत्तर देताना कौन राहुल? असा प्रतिप्रश्न केला होता अशी आठवण करुन दिली. त्यावरुनही आता नसीरुद्दीन शाह यांनी टोला लगावला आहे. विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाणारे राहुल गांधी एक लढवय्ये आणि आत्मविश्वास असलेले नेते म्हणून समोर आले आहेत, हे उत्तम झालं, असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. "मोदींनी एका मुलाखतीत कौन राहुल? असं अगदी तोऱ्यात म्हटलं होतं. मला वाटतं तो राहुल गांधींवर केलेला शेवटचा विनोद असेल," असंही नसीरुद्दीन शाह या व्हिडीओत म्हणालेत.
राहुल गांधींनी अलिकडचे एका विधानसभा मतदारसंघात एक लाखांहून अधिक मतं चोरल्याचा आरोप अगदी तपशीलवार सादरीकरणासहीत केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघात 1 लाखांहून अधिक बनावट मतं होती असा आरोप राहुल गांधींनी अगदी पुराव्यासकट केला आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राहुल गांधींच्या या प्रयत्नांना भारतीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी 'एकट्याची लढाई' सुरु आहे, असं म्हटलं आहे. राहुल गांधींनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे ऑनलाइन व्यापक चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधींनी केलेले दावे 'दिशाभूल करणारे' असल्याचे म्हणत त्यांनी केलेले दावे फेटाळून लावले आहेत. तर भाजपने या दाव्यांना निराधार म्हटले आहे.
राहुल गांधींनी केलेल्या खुलाश्यांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरोधात निषेध मोर्चाची योजना आखत असताना, नसीरुद्दीन शाहांसारख्या व्यक्तीच्या समर्थनामुळे निवडणूक आयोगाचा कारभार अधिक पारदर्शक असावा अशी मागणी करणाऱ्यांमध्ये त्यांच्या रुपाने एक महत्त्वाची व्यक्ती जोडली गेली आहे.
FAQ
1. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर कोणते आरोप केले आहेत?
राहुल गांधींनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, वेगवेगळ्या माध्यमातून मतांची चोरी होत असताना निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नाही. त्यांनी एक सविस्तर प्रेझेंटेशन सादर करत निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला (BJP) मदत होईल अशा बेकायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.
2. निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना काय उत्तर दिले?
निवडणूक आयोगाने राहुल गांधींना त्यांच्या आरोप प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून लिहून देण्यास सांगितले आहे. तसेच, त्यांनी राहुल गांधींचे दावे 'दिशाभूल करणारे' असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत.
3. भारतीय जनता पक्षाने (BJP) या आरोपांबाबत काय प्रतिक्रिया दिली?
BJP ने राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत.
4. नसीरुद्दीन शाह यांनी या प्रकरणात काय भूमिका घेतली?
नसीरुद्दीन शाह यांनी राहुल गांधींच्या कथित निवडणूक घोटाळ्यांविरुद्धच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधींच्या मत चोरीविरुद्धच्या प्रयत्नांचे समर्थन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'कौन राहुल?' या टोमण्याला कालबाह्य ठरवले.
5. नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान मोदींवर काय टीका केली?
नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत 'कौन राहुल?' असा टोमणा मारला होता, याची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले की, हा राहुल गांधींवर केलेला शेवटचा विनोद असेल, कारण राहुल गांधी आता लढवय्ये आणि आत्मविश्वासपूर्ण नेते म्हणून समोर आले आहेत.