Marathi News> भारत
Advertisement

रामनवमीच्या मुहूर्तावर देशाला मिळाला पहिला हायटेक-सी पूल; PM मोदींच्या हस्ते पंबन ब्रीजचं उद्घाटन

Narendra Modi Launches Pamban Rail Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरशी जोडणाऱ्या पंबन रेल्वे ब्रीजचं उद्घाटन केलं आहे. तामिळनाडूच्या मंडपम रेल्वे स्थानकाला देशातील पहिल्या व्हर्टिकल सस्पेंशन ब्रीजच्या माध्यमातून रामेश्वरम रेल्वे स्थानकाशी जोडण्यात आलं आहे.   

रामनवमीच्या मुहूर्तावर देशाला मिळाला पहिला हायटेक-सी पूल; PM मोदींच्या हस्ते पंबन ब्रीजचं उद्घाटन

Narendra Modi Launches Pamban Rail Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रामनवमीनिमित्त तामिळनाडूमध्ये देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी पूल असलेल्या न्यू पंबन ब्रिजचं उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदींनी पुलाखालून जाणारे तटरक्षक दलाचे जहाज आणि रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2.7 किलोमीटर लांबीचा हा पूल भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि दूरदर्शी पायाभूत सुविधांच्या विकासाचा पुरावा आहे.

रामनाथपुरम जिल्ह्यात स्थित हा पूल रामेश्वरम बेटाला मंडपमशी जोडतो. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवरत्न सार्वजनिक उपक्रम - रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे 700 कोटींपेक्षा जास्त खर्च करुन हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलात 72.5 मीटरचा नेव्हिगेशनल स्पॅन आहे जो वरती 17 मीटरपर्यंत उचलता येतो, ज्यामुळे जहाजं खालून सुरक्षितपणे जाऊ शकतात.

सध्या ट्रॅक एकाच मार्गावर सुरु असला तरी तो दोन रेल्वे ट्रॅकना देखील आधार देऊ शकतो, ताशी 80 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनसाठी हा मार्ग वापरता येणार आहे. तसंच पूल वाढती रेल्वे वाहतूक आणि जास्त भार सहन करु शकतो अशाप्रकारे उभारण्यात आला आहे. सरकारच्या दाव्यानुसार, या पुलाचं आयुष्मान 100 वर्षांचं आहे. 

आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानामुळे पांबन पुलाची तुलना अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिज, युकेमधील टॉवर ब्रिज आणि डेन्मार्क आणि स्वीडनमधील ओरेसुंड ब्रिज यासारख्या प्रसिद्ध पुलांशी केली जात आहे. जुना पंबन पूल 1914 मध्ये ब्रिटिश इंजिनिअर्सनी बांधला होता. त्यात मॅन्युअली चालवल्या जाणाऱ्या शेरझर स्पॅनचा (एक प्रकारचा रोलिंग लिफ्ट ब्रिज) वापर करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर तामिळनाडूत पोहोचलेले पंतप्रधान मोदी लवकरच रामेश्वरममधील रामानाथस्वामी मंदिरात पूजा करतील आणि त्यानंतर राज्यात 8300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील. 

दरम्यान श्रीलंकेहून परतताना नरेंद्र मोदी यांनी रामसेतूचं दर्शन घेतलं आणि त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

"थोड्या वेळापूर्वी श्रीलंकेहून परतताना, रामसेतूचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. आणि, एक दैवी योगायोग म्हणून, अयोध्येत सूर्य तिलक होत असतानाच ते घडले. दोघांचेही दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. प्रभु श्री राम हे आपल्या सर्वांसाठी एकजूट करणारी शक्ती आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्यावर राहोत," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Read More