Rs 2700 Crore Fraud: देशातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक गणला जाईल असा घोटाळा राजस्थानमध्ये समोर आला आहे. राजस्थानमधील सुभाष बीजरानी आणि रणवीर बीजरानी या दोघांनी 70 हजार लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. या दोन्ही भावांनी तब्बल 2 हजार 676 कोटी रुपयांची फसवणूक केली असून यामध्ये त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनीही मदत केली आहे.
सुभाष आणि रणवीर हे दोघेही राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील असून त्यांनी 'नेक्स एव्हरग्रीन' नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक परतावा दिला जाईल असा दावा त्यांनी केला. तसेच या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना गुजरातमधील 'धोलीरा स्मार्ट सिटी'मध्ये भूखंडही कंपनीकडून दिला जाईल असा दावा या दोन्ही भावांनी केला. या कथित स्मार्ट सिटीमधील काही बनावट फोटोही या दोघांनी गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी दाखवले.
चैन मार्केटींगप्रमाणे या योजनेमध्ये अधिक अधिक लोकांना सामावून घेणाऱ्यांना विशेष कमिशन आणि सवलती देण्यात आल्या. जितक्या जास्त लोकांना योजनेमध्ये सहभागी करुन घेणार तितक्या प्रमाणात नफ्याची टक्केवारी देण्यात आली. तसेच काही ठराविक उद्दीष्ट पूर्ण करुन कंपनीशी अधिक अधिक लोक जोडणाऱ्यांना इन्सेटीव्ह म्हणून लॅपटॉप, बाईक आणि कार देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. आपल्या आयडीअंतर्गत अधिक अधिक गुंतवणूकदार कंपनीला आणून दिल्यास जास्तीत जास्त नफा आणि टक्केवारी दिली जाईल असा दावा करण्यात आला.
रणवीरने सर्वात आधी धोलीरा येथे 2014 रोजी एक भूखंड विकत घेतला. त्यानंतर लष्करातून निवृत्त होताना मिळालेल्या 30 लाख रुपयांमधून सुभाषनेही याच ठिकाणी भूखंड विकत घेतला. यानंतर या दोघांनी 2021 मध्ये 'नेक्सा एव्हरग्रीन' नावाची कंपनी रजिस्ट करुन घेतली. अहमदाबादमध्ये त्यांनी या कंपनीची नोंदणी केली. ही कंपनी 'धोलीरा स्मार्ट सिटी' प्रकल्पाचा भाग असल्याचा दावा कंपनीकडूनच करण्यात आला. कंपनीकडे 1300 बिगा (260 एकर) जमीन असून लवकरच या ठिकाणाचा कायपालट करुन इथं जागतिक दर्जाचं शहर वसवलं जाणार असल्याचं गुंतवणुकदारांना सांगण्यात आलं.
अधिक परतावा आणि भूखंडाच्या हव्यासाने 70 हजारहून अधिक लोकांनी या भावांच्या योजनेमध्ये गुंतवणूक केली. भारतभरातून या खोट्या योजनेच्या अंतर्गत दोन्ही भावांनी 2676 कोटी रुपये जमा केले. या दोघांनी सलीम खान, समीर, दातार सिंग, रक्षपाल, ओमपाल आणि सनवारमाल असे आपले अधिकारीही निवडले. या लोकांच्या माध्यमातून त्यांना राजस्थानमधून अनेक लोकांना आपल्या योजनेत सहभागी करुन घेता आलं. हे योजनेशी जोडलेले लोक योजनेचे प्रचारक झाले. या मोबदल्यात त्यांना कमिशन वाटण्यात आलं. कमिशन म्हणून 1500 कोटी रुपये वाटण्यात आले. या फसवणुकीमधूनच उभारलेल्या पैशातून 1300 बिगा जमीन या दोघांनी विकत घेतली. या दोघांनी नंतर आलिशान कार विकत घेतली. खाणींबरोबरच राजस्थानमधील काही हॉटेल्सदेखील या दोघांनी विकत घेतले. दोघांनी अहमदाबादमध्ये अनेक फ्लॅट्स अन् गोव्यात 25 रिसॉर्ट्स विकत घेतले. या दोघांनी 250 कोटींची रोख रक्कम स्वत: जवळ ठेवली आणि 27 शेल कंपन्यांमध्ये इतर रक्कम वळती केली. शेल कंपन्या या करमुक्त देशांमध्ये बनावट नावाने तयार केलेल्या कंपन्या असतात.
फसवणुकीचा आरोप करण्यात आल्यानंतर या भावांनी आपली सर्व कार्यालये बंद केली. त्यानंतर राजस्थानमधील जोधपूर पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. मंगळवारी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने जयपूर, सिकर, झुनझून आणि गुजरातमधील अहमदाबादमध्ये एकूण 25 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये त्यांनी 'नेक्सा एव्हरग्रीन'संदर्भातील घोटाळ्यातील पैशाचा शोध घेतला.
खरा धोलीरा स्मार्ट सिटी प्रकल्प हा केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. ही भारतामधील पहिली ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी आहे. या शहराचा आकार दिल्लीच्या दुप्पट असेल असं नियोजन आहे. या ठिकाणी अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असतील. हे शहर 2042 पर्यंत बांधून होणार आहे.