Alwar Murder Case: राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात इंदोरमधील राजा रघुवंशीप्रमाणेच हत्येचं एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या सोबतीने पतीची निर्दयीपणे हत्या केली. महिलेने आपल्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांदेखत पतीला ठार केलं. मुलाने जेव्हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला तेव्हा सगळेच हादरले. याप्रकरणी अनिता, काशीराम आणि बृजेश जाटवला अटक करण्यात आलं आहे. उर्वरित तीन आरोपी विष्णू, नवीन आणि चेतन फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 जून 2025 च्या रात्री ही घटना घडली. तंबूचा व्यवसाय करणारे 32 वर्षीय विरु जाटव आपल्या घऱात मृत स्थितीत आढळले. पत्नीने आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. तिने आपल्या वहिनीला फोन करुन, विरुला सायलेंट अटॅक आल्याचं सांगितलं. तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याचा दावा तिने केला. पण विरुच्या मोठ्या भावाला संशय आला. गळ्यावर खुणा पाहिल्यानंतर त्याचा संशय आणखीनच बळावला.
गब्बर जाटव याने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यानंतर तपास सुरु झाला. या संपूर्ण हत्याकांडमध्ये विरु आणि अनिताचा 9 वर्षांचा मुलगा मुख्य साक्षीदार ठरला. त्याने रात्री नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे पोलिसांना सांगितलं. त्याने सांगितलं की, वडील रात्री उशिरा घरी आले होते. त्यांनी आपला फोन चार्ज करण्यास सांगितलं होतं. अनिताने मुलाला लवकर झोपण्यास सांगितलं होतं. पण त्या रात्री खाट हालण्याचा आवाज ऐकून मुलाला जाग आली. डोळे उघडले असता आईने मुख्य दरवाजा उघडला असल्याचं त्याच्या लक्षात आलं. बाहेर अनिताचा प्रियकर काशीराम प्रजापत उभा होता.
मुलाने सांगितलं की, "मी फार घाबरलो होतो, यामुळे शांत उभा राहून पाहत होतो. तो लोक आमच्या रुममध्ये आले. आई खाटेसमोर उभी होती. त्या लोकांना बाबांना पकडलं, बुक्क्या मारल्या, पाय आणि गळा दाबला. काशी अंकलने बाबांच्या तोंडावर उशी ठेवून दाबली. मी बाबांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काशी अंकलने मला उचललं आणि शांत राहायला सांगत धमकावलं. मी घाबरुन गप्प बसलो. काही वेळाने बाबा हालायचे बंद झाले. यानंतर सगळे निघून गेले. आई काहीच बोलली नाही, फक्त पाहत राहिली. आई फार वाईट आहे. तिने बाबांना मारुन टाकलं".
पोलीस तपासात अनिता आणि विरु यांचा प्रेमविवाह झाल्याचं समोर आलं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. अनिताचा घटस्फोट झाला होता आणि एक मुलगा होता. विरुचाही घटस्फोट झाला होता. अनिताचं एक जनरल स्टोअर होतं. तर काशीराम प्रजापतची कचोरी टपरी होती. तो नेहमी तिच्याकडे जात असे आणि यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. विरुला पत्नीच्या या संबंधांची माहिती मिळाली होती. आणि त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यातून सुटका करुन घेण्यासाठीच तिने हत्येचा कट रचला होता.
एसएचओ धीरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, "ही हत्या पूर्ण योजना आखूनच करण्यात आली. अनिताने काशीरामसोबत मिळून चार जणांना 2 लाखात हत्येची सुपारी दिली होती. हत्येच्या रात्री अनिताने जाणुनबुजून दरवाजा उघडा ठेवला होता. जेणेकरुन काशीराम आणि इतर सहकारी सहजपणे आत येऊ शकतील". काशीरामने त्याचे चार साथीदार विष्णू, नवीन, चेतन आणि ब्रिजेश जाटव यांच्यासह वीरूवर हल्ला केला. वीरू झोपेत असताना त्याला प्रथम ठोसे मारून आणि मारहाण करून बेशुद्ध केले आणि नंतर मृत्यूची कहाणी रचण्यात आली.
विरुच्या हत्येनंतर अनिताने नातेवाईकांना फोन करुन आजारामुळे अचानक मृत्यू झाल्याचा दावा केला. पण मृतदेहाची स्थिती आणि जखमांमुळे गब्बर जाटवला आलेला संशय यामुळे हत्या झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी गब्बरच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलीस तपासास 100 हून अधिक सीसीटीव्ही पडताळण्यात आले. फोन कॉल रेकॉर्ड्सचं विश्लेषण करण्यात आलं आहे. त्यातच मुलाने दिलेल्या जबाबातून कट उघड झाला. पोलिसांनी अनिता, काशीराम आणि बृजेश जाटवला अटक केलं आहे. इतर तीन आरोपी सध्या फरार आहेत.