Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या विकासकामांसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक विधानाकडे देशातील जनतेचं लक्ष लागलेलं असतं, गेल्या 11 वर्षात जे काही पाहिले ते फक्त एक रिल होतं. आणि खरा चित्रपट अजून येणे बाकी आहे, असे विधान नितीन गडकरींनी केलं. यामुळे पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात गरडकरींच्या विधानाची चर्चा होतेय. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत गडकरींना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले होते.
पक्ष स्वतःच आपल्या कार्यकर्त्यांसाठी जबाबदाऱ्या ठरवतो आणि भाजप माझ्यासाठी जी काही जबाबदारी ठरवेल ती मी पूर्ण करेन असे गडकरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेण्यात आली होती. 'आतापर्यंत जे काही घडले ते फक्त एक रिल होतं, खरा चित्रपट अजून सुरू व्हायचा आहे', असे ते म्हणाले. 'कार्यकर्त्याकडे कोणती जबाबदारी असेल आणि तो कोणते काम करेल हे पक्ष ठरवतो. मला जी काही जबाबदारी देण्यात येईल ती मी पूर्ण करेन', असे त्यांनी पुढे सांगितले.
मी कधीच माझा राजकीय बायोडेटा प्रकाशित केलेला नाही. तसेच विमानतळांवर माझे भव्य स्वागत कार्यक्रम आयोजित करा असं कधी कार्यकर्त्यांना सांगितले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काम करणे ही माझी वैयक्तिक इच्छा असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. आजकाल मी रस्ते बांधणीपेक्षा शेती आणि इतर सामाजिक उपक्रमांवर अधिक काम करतोय, असेही त्यांनी सांगितले.
भारताचे दरडोई उत्पन्न जगातील पहिल्या 10 मध्ये का नाही? असे विचारले असता, केंद्रीय मंत्री म्हणाले की यासाठी देशाची लोकसंख्या जबाबदार आहे. त्यांनी यावेळी लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचे समर्थन केले. 'हा धार्मिक किंवा भाषिक मुद्दा नाही. हा आर्थिक मुद्दा आहे. इतका विकास होऊनही त्याचे परिणाम दिसत नाहीत. याचे कारण वाढती लोकसंख्या असल्याचे' ते म्हणाले. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2014 पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या विविध कामगिरीवर प्रकाश टाकला.