Skeleton Found In Hyderabad House: एक बंद घर, घरासमोरच क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल या घरात जाऊन पडला. बॉल घेण्यासाठी एक व्यक्ती घरात गेली मात्र तेथील दृश्य पाहून हादरलाच. हैदराबादच्या नामपल्ली परिसरात कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या घरात हाडांचा सांगाडा सापडला आहे. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला आहे. त्यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हाडांचा सांगाडा 10 वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. तसंच, जिथे हा सांगाडा आहे ती जागा किचन असू शकते. कारण आसपास अनेक भांडी पडल्याचे दिसतंय.
पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, नामपल्ली येथील घरात सापडलेला सांगाडा हा अमीर खान नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आलं आहे. हे घर मुनीर खान यांचे होते. त्यांना 10 मुलं होती. त्यांचा तिसरा मुलगा अमीर खान घरात एकटाच राहत होता. तर त्यांची इतर भावंड दुसरीकडे स्थायिक झाली. जिथे हा सांगाडा सापडला तिथे नोकियाचा फोनदेखील सापडला होता.
सहाय्यक पोलीस आयुक्त किशन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनची बॅटरी संपली होती. त्यानंतर फोन दुरुस्त केल्यानंतर लक्षात आले की सांगाडा अमीर यांचा आहे. फोन लॉगमध्ये शेवटचा फोन 2015 ला आलेला दिसत होता. तसंच, 84 मिस कॉलदेखील होते. मयत व्यक्तीचे वय तेव्हा 50 वर्षीय असून तो अविवाहित होता. इतकंच नव्हे तर त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्याच्या मृत्यूला 10 वर्ष झाली होती. आता सांगाड्याची हाडंदेखील तुटू लागली होती.
घटनास्थळावरुन रक्ताचे डाग सापडले नाहीत. त्यामुळं नैसर्गिक मृत्यू झाला असावा. दुर्दैवी म्हणजे आमिर यांच्या भावा-बहिणीने त्यांची चौकशी करण्याचाही प्रय़त्न केला नाही. मोबाईल फोन व्यतिरिक्त उशीखाली जुन्या नोटा सापडल्या आहेत. त्यामुळं या व्यक्तीचा मृत्यू नोटबंदीच्या आधी 2016 च्याआधी झाल्याचा अंदाज आहे. मयत व्यक्तीचा लहान भाऊ शादाब या तिथेच राहतात. त्यांनी सांगाड्याच्या अवशेषावरील आंगठीवरुन आणि शॉर्ट्सवरुन ओळख पटवली आहे. मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याचे अवशेष लॅबमध्ये पाठवले आहेत.