Marathi News> भारत
Advertisement

गुकेशकडून हरल्यानंतर कार्लसनने रागाच्याभरात नको तेच केलं, नंतर माफी मागण्याची वेळ!

Norway Chess:  या विजयाने गुकेश खूप आनंदी दिसत होता. तर कार्लसनला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही.

 गुकेशकडून हरल्यानंतर कार्लसनने रागाच्याभरात नको तेच केलं, नंतर माफी मागण्याची वेळ!

Norway Chess: नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा विश्वविजेता डी गुकेशने अनुभवी मॅग्नस कार्लसनला हरवून मोठा विजय मिळवला. या विजयाने गुकेश खूप आनंदी दिसत होता. तर कार्लसनला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. कार्लसनला त्याच्याच देशात गुकेशकडून पराभव सहन झाला नाही. कार्लसनच्या कृतीवर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

कार्लसन खुर्चीवरून उठला आणि निघून गेला

पराभवानंतर कार्लसनने बुद्धिबळ बोर्ड ठेवलेल्या टेबलावर जोरात हात मारला. त्याच्या हातांनी मारल्यामुळे संपूर्ण बुद्धिबळ बोर्ड हलले. यानंतर कार्लसन खुर्चीवरून उठला आणि निघून गेला. पण नंतर बुद्धिबळ बोर्डावर येऊन त्याने गुकेशची माफी मागितली. नंतर त्याने सोंगड्या पुन्हा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. 

गुकेशने जिंकल्यानंतरही शांत

दुसरीकडे गुकेशने जिंकल्यानंतरही शांतपणे आनंद साजरा केला. आपली मेहनत कामी आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसरीकडे कार्लसन वेगाने चालत हॉलमधून निघून गेला. जाताना त्याने गुकेशच्या पाठीवरही थाप दिली. त्याचा व्हिडिओही समोर आलाय. तिथे बसलेल्या सर्व लोकांनी गुकेशसाठी टाळ्या वाजवल्या.

कार्लसनने चुका केल्या

गुकेशने कार्लसनवर क्लासिकल बुद्धिबळात पहिला विजय मिळवून कार्लसनला आश्चर्यचकित केले. पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना कार्लसनने सामन्यात बहुतेक वेळा त्याचा फायदा घेतला आणि सतत दबाव निर्माण केला. पण गुकेश सावधगिरीने खेळला आणि नंतर त्याने कार्लसनवर हल्ला केला. त्यामुळे कार्लसनवर वेळेत चाली करण्याचा दबाव वाढत गेला. कार्लसनने चुका केल्या आणि यामुळे गुकेशला पुनरागमन करण्याची संधी मिळाली.

वेळेवर चाली करण्याचा दबाव

गुकेशने सामन्यात आपले सर्व कौशल्य पणाला लावले आणि विजय नोंदवला. 'मी फार काही करू शकलो नाही. मला फक्त त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा होता. मी कार्लसनसाठी कठीण असलेल्या चाली करत होतो आणि सुदैवाने चाली योग्य ठरल्याचे', गुकेशने सांगितले. तसेच वेळेवर चाली करण्याचा दबाव तुम्हाला चुका करण्यास भाग पाडू शकतो हे मी या खेळातून शिकल्याचेही गुकेशने सांगितले. 

मागील पराभवाचा बदला 

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दोघांमध्ये टक्कर झाली होती. जिथे कार्लसनने त्याच्या ट्रेडमार्क चालींनी विजय मिळवला. त्यानंतर गुकेशने कमबॅक करत त्याच्या मागील पराभवाचा बदला घेतला. नॉर्वे बुद्धिबळ हा बुद्धिबळ कॅलेंडरवरील प्रमुख स्पर्धांपैकी एक मानला जातो. सहा खेळाडू डबल राउंड-रॉबिन स्वरूपात एकमेकांशी सामना करतात. पुरुष आणि महिला दोन्ही गटात सामने आहेत. 2025 ची सिरिज 26 मे ते 6 जून दरम्यान स्टॅव्हॅन्गर येथे खेळवली जाणार आहे.

Read More