Marathi News> भारत
Advertisement

मंदीच्या दिवसांत मर्सिडीज कारचा अनोखा विक्रम, मुंबईकरांनी मारली बाजी

कुठे आहे ती आर्थिक मंदी?

मंदीच्या दिवसांत मर्सिडीज कारचा अनोखा विक्रम, मुंबईकरांनी मारली बाजी

मुंबई : दसरा म्हटलं किंवा एकंदरच नवरात्रोत्सवाचं पर्व म्हटलं की सर्वत्र मांगल्य पाहायला मिळतं. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही नव्या गोष्टी खरेदी करण्याकडे सर्वांचाच कल असतो. यावेळी हा कल दिसून आला तो म्हणजे कार खरेदीमध्ये. मुख्य म्हणजे सर्वत्र आर्थिक मंदी असल्याची ओरड होत असतानाच झालेली ही विक्रमी खरेदी पाहता, 'कुठे आहे ती आर्थिक मंदी?' असाच प्रश्न उपस्थित होत आहे. 

नवरात्रोत्सवाच्या पर्वानंतर आलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर जर्मन बनावटीच्या मसिर्डीस बेंझ कार्सची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल २०० मर्सिडीस बेंझ एका दिवसात विकल्या गेल्याची माहिती कंपनीकडूनच देण्यात आली आहे. मुंबई, गुजरात आणि देशातील इतर काही भागांमध्ये या कार पोहोचवण्याचत आल्या आहेत. 

नवरात्र आणि दसऱ्याचा मुहूर्त साधत कारसाठीचं बुकींग झाल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन श्र्वेंक यांनी सांगितलं. हे सर्व प्रमाण पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कार विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. कंपनीसाठी ही अत्यंत चांगली बाब असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर मर्सिडीज बेंझच्या एकूण १२५ कार मुंबईत आल्या. आतापर्यंतचा हा एका दिवसातील विक्रमी आकडा. तर, ७४ कार या गुजरातमध्ये पोहोचल्या. या सर्व कारमध्ये सी आणि ई क्लासच्या सीदान आणि स्पोर्ट्स युटीलिची कारचा समावेश आहे.  कारच्या विक्रीचा हा एकंदर आकडा पाहता एकीकडे मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा एँड महिंद्रा, होंडा, टाटा मोर्टस या कंपन्यांना आर्थिक मंदीचा फटका बसतोय अशा बातम्या येत असताना मर्सिडीसची चांदी झाली असं म्हणायला हरकत नाही. 

Read More