Marathi News> भारत
Advertisement

Dark Storage : तुमच्या दारावर 10 मिनिटांत येणाऱ्या सामानामागचं ‘डार्क स्टोरेज सिक्रेट’; कशी काम करते ही यंत्रणा?

10 Min Online Delivery: हस्तकलेच्या सामानापासून ते अगदी स्वयंपाकघरात लागणाऱ्या लहानसहान गोष्टींपर्यंत... कैक पर्याय ऑनलाईन पद्धतीनं फारफार तर 10 मिनिटांमध्ये मागवता येतात...

Dark Storage : तुमच्या दारावर 10 मिनिटांत येणाऱ्या सामानामागचं ‘डार्क स्टोरेज सिक्रेट’; कशी काम करते ही यंत्रणा?

10 Min Online Delivery: डिजिटलायझेशन आणि ई कॉमर्स वेबसाईट्सच्या लाटेमध्ये अनेक गोष्टी बदलल्या. प्रत्यक्षात दुकानावर जाऊन वाणसामान खरेदी करणं किंवा अगदी मंडईत जाऊन भाजीपाला आणि फळं खरेदी करण्याचे दिवस तर जणू बरेच मागे पडले किंवा अनेकांच्या तर विस्मरणात गेले. हल्ली फळं म्हणू नका किंवा वाणसामान, किंवा अगदी एखादी किरकोळ वस्तू खरेदीसुद्धा हातात असणाऱ्या मोबाईलच्या मदतीनं होते.

एका क्लिकवर अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळं ग्राहकांचा संपूर्ण कल ऑनलाईन शॉपिंगकडे दिसून येत आहे. भारतात दर मिनिटाला याच ऑनलाईन शॉपिंगच्या उपलब्धतेमुळं 3 हजार 400 हून जास्त प्रोडक्टची डिलीव्हरी होत आहे. फळं म्हणू नका किंवा मग तूल, तांदूळ तेल... अगदी साबण आणि तत्सम सामानसुद्धा काही मिनिटांत घरपोच येत आहे. पण, महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व वस्तू ताज्या आहेत का, त्यांची वापरण्यासाठीची मुदत संपली आहे की नाही याची मात्र खात्री दिली जात नाही.

मागील काही दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं मागवण्यात आलेल्या सामानामध्ये काही त्रुटी आढळल्यानं अनेक Apps कडून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या कथीत हमीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं. याचसंदर्भात झेप्टोपासून झालेली ही सुरुवात ब्लिंकीटवर येऊन थांबली, जिथं पुण्यातील ब्लिंकिट स्टोअर बंद करण्यात आलं. या स्टोअरला F-S-S-A-I  परवाना नसल्यानं ते बंद करण्याची कारवाई झाल्याचं वृत्त समोर आलं.

डार्क स्टोअरचं सत्य काय?

डार्क स्टोअर ही एक अशी जागा आहे, जिथं विविध कंपन्यांची विविध उत्पादनं एकाच ठिकाणी ठेवली जातात. ज्या क्षणी ऑनलाईन पद्धतीनं ग्राहक सामान मागवतात तेव्हा हे सामान डार्क स्टोअरमधून थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचतं. प्रत्यक्षात हे कोणतंही दुकान नसल्यानं त्याला डार्क स्टोरेज असं म्हटलं जातं. सामान्यत: मोठ्या शहरांमध्ये साधारण 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे स्टोअर आढळतात.

AI च्या मदतीनं ज्या भागात डार्क स्टोरेज आहेत तिथं नेमकी कोणत्या सामानाला सर्वधिक मागणी आहे याचा अंदाज घेतला जातो आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी सामानाची साठवण केली जाते.

सामान मागवताय खरं पण ते तपासूनही पाहा...

डार्क स्टोरेज हे एक फ्रँचायझी मॉडेल म्हणून काम पाहतं. ज्यांचा करार थेट डिलिव्हरी सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांशी असतो. ज्यामुळं डार्क स्टोरेजमध्ये असणारं सामान अनेकदा खराब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळं Online पद्धतीनं सामान मागवत असताना त्याची एक्सपायरी डेट आणि इतर माहिती तपासून पाहा.

प्रलोभनांपासून दूर राहा

एखादी वस्तू ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करत असताना अनेकदा कंपन्या काही पर्याय ग्राहकांना देतात. फ्री होम डिलिव्हरी, अमुक एक सामान मोफत, तमूक पैसे वाचवण्याची संधी किंवा मग कॅशबॅक. अशा एक ना अनेक प्रलोभनांनी ग्राहकांचं लक्ष वेधण्याचं काम केलं जातं. अनेकदा तुम्ही ज्या वस्तू खरेदी करत आहात त्यांचा साठा कमी असल्याचं भासवत त्या तातडीनं खरेदी करण्यासाठीचं तंत्रही या App कडून वापरात आणलं जातं. अनेकदा सामान किमान वेळेत घरी पोहोचेल असं सांगितलं जातं आणि इथं ग्राहकांच्या मानसिकतेशी एक अप्रत्यक्ष संवाद साधला जातो. AI च्या मदतीनं ही सारी गणितं केली जातात आणि हेच या डार्क स्टोरेजचं डार्क सिक्रेट आहे असं म्हणणं गैर नाही. सततचं आमिष दाखवून या डार्क सिक्रेटच्या माध्यमातून ग्राहकांना जाळ्यात खेचलं जातं आणि यातूनच गरज नसतानाही बऱ्याचदा अवाजवी सामानाची Order Place केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर सुरू असणारा हा खेळ आणि त्याची पाळंमुळं अतिशय खोलवर गेली असून, पैसे आणि आरोग्याची काळजी घ्यायची असल्यास ऑनलाईन खरेदी करताना सजग राहणं कधीही उत्तम! 

Read More