Marathi News> भारत
Advertisement

युद्ध थांबल्यानंतरही पाकिस्तानची सुटका नाहीच! भारत 'या' 6 निर्णयांवर ठाम; शेजाऱ्यांची हालत खराब

India Pakistan Ceasefire Restrictions On Pakistan Will Be Continued: युद्धविराम म्हणजे पाकिस्तानची सुटका नाही; पाकिस्तानवर दबाव कायम ठेवत भारताचे 6 मोठे निर्णय अद्यापही मागे घेतलेले नाहीत.

युद्ध थांबल्यानंतरही पाकिस्तानची सुटका नाहीच! भारत 'या' 6 निर्णयांवर ठाम; शेजाऱ्यांची हालत खराब

India Restrictions On Pakistan Will Be Continued: काश्मीरमधील पहलगाम 22 एप्रिल रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली. भारताने पाकिस्तानचा प्रत्येक डाव हाणून पाडला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला. मात्र पाकिस्तानने या घोषणेनंतर अवघ्या तीन तासांमध्ये शस्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर पुढल्या काही तासांमध्येच पुन्हा भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले केले. हेही हल्ले भारताने यशस्वीरित्या परतवून लावले. 7 मेनंतर पाकिस्तानचा कुठलाच डाव भारताने यशस्वी होऊ दिला नाही. भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानवरील दबाव आणि इतर निर्बंध भारताने अजून उठवलेले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून घेण्यात आलेल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारताने कोणते निर्बंध कायम ठेवलेत पाहूयात...

सिंधू कराराला दिलेली स्थगिती कायम राहणार

युद्धविराम करारात कोणत्याही पूर्वअटींचा समावेश नाही. सिंधू नदी पाणी करार स्थगितच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला हा करार भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांमधील पाण्याचे वितरण आणि वापराचे नियमन करतो. या कराराचा पाकिस्तानला फायदा झाला आहे. पाकिस्तानला या नद्यांमधून एकूण पाण्याच्या सुमारे 80 टक्के पाणी मिळते. हे पाणी पंजाब आणि सिंध प्रांतांसाठी महत्त्वाचे आहे.

अटारी सीमा बंदच

अटारी सीमा बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे. सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हालचालींनंतर भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा क्रॉसिंग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला. पंजाबमधील अटारी येथील चेकपोस्ट बंद करण्यात आले आहेत. वैध कागदपत्रांसह सीमा ओलांडणाऱ्यांना 1 मे पूर्वी याच मार्गाने मायेदेशी परतण्याचे निर्देश देण्यात आले होते. 1 मे पासून ही सीमा बंद आहे. 

भारत पाकिस्तान व्यापारावर निर्बंध

पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर असलेली बंदी कायम राहणार असल्याचे समजते. थेट बंदी असो किंवा मध्यस्थ देशांद्वारे असो भारताची व्यापरी निर्बंधांची भूमिका कायम आहे. पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. तसेच टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे.

हवाई क्षेत्रही बंद

पाकिस्तानात ये-जा करणाऱ्या किंवा पाकिस्तानाच्या हद्दीतून येणाऱ्या विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. हा निर्णयही कायम ठेवण्यात आला आहे. 30 एप्रिलपासून भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारतीय हवाई हद्द सोडल्यानंतर पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करणाऱ्या परदेशी विमान कंपन्यांना लांब, पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांवरील भार वाढला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा बंद

राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी भारताने पाकिस्तानी कलाकार आणि कलाकारांवर बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, भारतात कार्यरत असलेल्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना पाकिस्तानमध्ये तयार केलेल्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर डिजिटल सामग्री प्रक्षेपित करु नये असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आङेत.

व्हिसा सेवा बंद

भारतातील पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा निलंबित करण्याची भारताची भूमिका कायम आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतात असलेल्यांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले होते. वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला होता, त्यानंतर तोही रद्द करण्यात आला. अखेरची मुदतवाढ ही 1 मे रोजीची होती.

Read More