Operation Sindoor Pahalgam Terror Attack : भारतातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ अशी ओळख असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या भागातील अनेक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदीही घालण्यात आली आहे. कारण ठरतंय ते म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचं उत्तर भारतीय लष्करानं दिलं असलं तरीही आता मात्र तपासातून आणखी काही माहिती समोर येते का हे चाचपण्य़ासाठी म्हणून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं थेट J&K मध्ये जाऊन आलेल्या पर्यटकांकडेच आपला मोर्चा वळवला आहे.
एका अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पहलगाम हल्ल्यासंदर्भातील कोणताही व्हिडीओ, फोटो किंवा इतर कोणतीही महिती त्यांच्याजवळ असल्यास ती तातडीनं तपास यंत्रणेकडे सोपवावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यंत्रणेच्याच माहितीनुसार आतापर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडीओ जमवले असून त्या धर्तीवर हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. मात्र आता या प्रयत्नांमध्ये आणखी काही माहिती थेट इथं येऊन गेलेल्या पर्यटकांकडूनच मिळवली जाणार आहे.
एनआयएच्या आवाहनानुसार कोणाही व्यक्तीकडे पहलगाम हल्ल्यासंदर्भातील कोणतीही माहिती असल्यास त्यांनी त्याची कल्पना 9654958816 या मोबाईल क्रमांकावर किंवा 01124368800 या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी. संपर्क साधताना आपली ओळखही सांगण्याचं आवाहन करत या व्यक्तिंशी थेट एनआयएचे वरिष्ठ अधिकारी संपर्क साधणार असून फोटो , व्हिडीओ किंवा इतर माहिती मिळवण्यासाठीची पुढील व्यवस्था करतील असं सांगण्यात आलं आहे.
हेसुद्धा पाहा : Operation Sindoor : भारताचा 'सिक्रेट प्लान' जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार...
पहलगाम हल्ल्याची मोडस ऑपरेंडी करण्यासाठी एनआयएनं हे पाऊल उचललं असून, अनावधानानं किंवा अगदी जाणीवपूर्वक त्या भागाशी किंवा त्या घटनेशी संबिधित लहानातील लहान माहिती काश्मीरमधील या भ्याड हल्ल्याच्या मुळाशी नेण्यास मदत करेल असा विश्वास एनआयएनं व्यक्त केला आहे. फक्त पर्यटकच नव्हे, तर जम्मू काश्मीरमध्ये दरम्यानच्या काळात भेट देणाऱ्या स्थानिकांसह काही इतर कारणास्तव तिथं असणाऱ्यांना उद्देशून हे आवाहन करण्यात आलं आहे.
The National Investigation Agency (NIA) has appealed to all tourists, visitors and local people who might have any more information, photographs or videos relating to the Pahalgam terror attack on tourists to immediately contact the agency. pic.twitter.com/q8VFchsbnh
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानला हादरा देणाऱ्या भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालयं आणि नजीकची विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरेझ शैक्षणिक संस्था देखील बंद राहणार असून काश्मीर विद्यापीठाने 10 मे पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तर, श्रीनगर विमानतळ 10 तारखेपर्यंत नागरी उड्डाणांसाठी पूर्णपणे बंद असेल.