5 Questions To BJP Over Tiranga Yatra: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीच्या तिरंगा यात्रेला विरोध करत याच मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "पहलगाम हल्ल्याचा बदला पूर्ण झाला नसताना अशा यात्रा काढणे व राजकारण करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही," असं म्हणताच, "तिरंगा यात्रा हे राजकीय थोतांड आहे," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लागवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं तिरंगा यात्रा काढण्याआधी पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी मागणी करत पाच प्रश्न विचारले आहेत.
"मुळात ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण होण्याआधीच प्रेसिडंट डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देऊन भारताला युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा पराभव निश्चित असताना पंतप्रधान मोदी यांनी व्यापाराच्या लोभापायी ट्रम्प यांची धमकी मान्य केली व युद्ध बंद केले. यात ‘सिंदूर’चा बदला कोठे पूर्ण झाला? त्यामुळे एकाच वेळी ‘सिंदूर’ आणि ‘तिरंगा’ यांचा अपमान या लोकांनी केला. भाजप अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी व त्यांच्या पक्षाने तिरंगा यात्रा काढून विजयाचा जल्लोष करणे म्हणजे सिंदूर गमावलेल्या त्या माता-भगिनींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
"तिरंगा यात्रा जे काढत आहेत त्यांना या देशाचे पाच प्रश्न आहेत," असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं पाच प्रश्न उपस्थित केलेत. शिवसेनेनं विचारलेला पाच प्रश्न खालीलप्रमाणे:
> पहलगाम हल्ला भारतीय हद्दीत झाला. मग त्याची जबाबदारी देशाच्या गृहमंत्र्यांनी घ्यायला नको काय? गृहमंत्री अमित शहा यांनी 26 हत्यांबाबतची चूक मान्य केली. त्यामुळे त्यांना बडतर्फ का करू नये?
> पहलगाम हल्ल्यातले ते पाच-सहा दहशतवादी सापडले नाहीत. ते गेले कोठे? भारताने पाकचे 11 सैनिक मारले. त्यापेक्षा हे पहलगामचे अपराधी मारायला नकोत काय? ही जबाबदारी फक्त अमित शहांचीच आहे. ते महाशय सध्या कोठे आहेत?
> पाकिस्तानला भारत अशी जबरदस्त अद्दल घडवणार होता की, पाकिस्तान पुन्हा जमिनीवरून उठणार नाही असे सांगितले गेले. आज पाकिस्तानात युद्ध जिंकल्याचा जल्लोष सुरू आहे तो कशाच्या जोरावर?
> पाकव्याप्त कश्मीरवर कब्जा मिळविण्यासाठी हे युद्ध होते? मग किती इंच ‘पीओके’ भारताने मिळवले?
> अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारत-पाक युद्ध आपण थांबवले असल्याची घोषणा वॉशिंग्टनमधून केली. हे एका सार्वभौम राष्ट्रावरचे आक्रमण आहे. भारताच्या 56 इंचाच्या छातीला ‘पिन’ लावून हवा काढण्याचा हा प्रकार पंतप्रधान मोदींना मान्य आहे काय?
"हे पाच प्रश्न महत्त्वाचे आहेत व त्यांची उत्तरे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे आंधळे भक्त देत नाहीत तोपर्यंत तिरंगा हाती घेऊन यात्रा काढण्याचे अधिकार त्यांना नाहीत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.