Operation Sindoor Pakistani PM Shehbaz Sharif Agnry Reaction: भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत 7 मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) आपत्कालीन बैठक बोलावली आहे. "भारताने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी केलेले हे हल्ले भ्याडपणाचे प्रतीक आहेत," असं शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. "पाकिस्तानला या आक्रमणाला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे," असंही शरीफ यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन, "शत्रूने पुन्हा एकदा आपली कपटी वृत्ती दाखवली आहे. पण पाकिस्तानची जनता आणि लष्कर या शत्रूचा सामना कसा करायचा हे चांगलेच जाणते," असं म्हटलं आहे. भारताने केलेल्या या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी इस्लामाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
शरीफ यांनी आपल्या अकाऊंटवरुन उर्दूत पोस्ट करताना, "कपटी शत्रूने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी भ्याड हल्ले केले आहेत. भारताने लादलेल्या या युद्ध छेडणाऱ्या कृतीला पाकिस्तानला ठोस आणि ताकदीने प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि हे प्रत्युत्तर दिलं जात आहे," असं म्हटलं आहे. तसेच, "संपूर्ण पाकिस्तानची जनता आपल्या लष्करासोबत खंबीरपणे उभी आहे आणि संपूर्ण राष्ट्राचा आत्मविश्वास आणि मनोबल उंचावलेलं आहे. पाकिस्तानी जनता आणि लष्कर शत्रूचा सामना कसा करायचा हे चांगलेच जाणतात. शत्रूचे नापाक हेतू यशस्वी होऊ देणार नाही, याची हमी आम्ही देतो," असंही शाहबाज शरीफ म्हणाले आहेत.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या मुरिदके येथील मुख्यालयावरही सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला आहे. भारताने एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करीत पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये किमान 12 दहशतवादी ठार झाले असून 55 पेक्षा अधिक दहशतवादी जखमी झाले आहेत.
> मुरिदके (लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय)
> मसूद अझहरचा मदरसा (जैश-ए-मोहम्मद)
> कोटली, अहमदपूर शरकिया, मुजफ्फराबाद, फैसलाबाद – सर्व ठिकाणी भारतीय हवाई दलाने अचूक लक्ष्यभेद केला.
वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जारी केलेल्या पत्रकामध्ये, "भारताची कारवाई केंद्रित आणि अचूक होती. ती जबाबदारीने करण्यात आली असून ती आक्रमक स्वरूपाची नव्हती," असं भारताने स्पष्ट केलं आहे. तसेच, "भारताने कोणत्याही पाकिस्तानी नागरी, आर्थिक किंवा लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेले नाही. फक्त ज्ञात दहशतवादी तळांवरच हल्ले करण्यात आले आहेत," असंही भारताने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे, "हल्ल्यानंतर तातडीने, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी संपर्क साधून भारताने केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली," असंही भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.