India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये (Pahalgam Terror Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यांनंतर तणाव आखी वाढला. दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर पार पाडत 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननंही सीमाभागातून भारतात हवाई आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. ज्यापैकी बहुतांश हल्ले भारतानं तितक्याच ताकदीनं परतवून लावले. या तणावाला युद्धजन्य परिस्थितीचं वळण मिळत असतानाच अखेर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर मात्र परिस्थिती अंशत: निवळल्याचं चित्र समोर आलं.
Ind Pak मध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर तातडीनं सीमावर्ती भागांमध्ये पोलीस बॉम्बशोधक पथक आणि लष्करानं एकत्र येत पाकिस्ताकडून डागण्यात आलेले बॉम्ब शोधून ते निकामी करण्याची धडक मोहिम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील काही लहान गावांमध्ये जिवंत बॉम्ब निकामी केल्यानंतरच स्थानिकांना त्यांच्या घरी जाण्याची वाट मोकरी करण्यात आली.
यंत्रणा सर्वतोपरि स्थानिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली असली तरीही अद्यापही या भागांमध्ये साधारण शंभरहून अधिक बॉम्ब जिवंत अवस्थेत असून त्यांच्या स्फोटाचा धोका मात्र कायमच असून आंतरराष्ट्रीय सीमाभागातील कमलकोट, गौहलान, सलामाबाद, गवाल्टा, गंगरहिल भागांमधूनही असे बॉम्ब निकामी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पंजाब आणि राजस्थान सीमेनजीकही अशीच परिस्थिती असल्याचं चित्र समोर आलं. पाकिस्ताननं जैसलमेरमध्येही ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात काही जिवंत बॉम्ब आणि मिसाईलचे अवशेष अद्यापही य़ेथील सीमाभागातील गावांमध्ये सापडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायमच आहे. तर पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात मुठियांवाली गावात रविवारी रात्रीच्या सुमारास एक जिवंत बॉम्ब सापडल्यानं खळबळ माजल्याचं वृत्तसुद्धा समोर आलं होतं. त्यामुळं शस्त्रसंधी लागू असतील तरीही अद्यापही जिवंत बॉम्ब सापडण्याचं सत्र सुरू असल्यानं हा धोका पूर्णपणे टळला नाही हीच वस्तूस्थिती समोर येत आहे.