PM Modi In Heigh Level Security Meeting: पहलगाम येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार करुन 26 जणांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला एका आठवड्याहून अधिक कालावधी पूर्ण झालेला असातनाच भारत या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करेल अशी जोरदार चर्चा आहे. असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवरील हल्ल्यासंदर्भात सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पहलगाम हल्ल्याला उत्तर कधी आणि कसं द्यायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार लष्कराला असल्याचं मोदींनी उच्च स्तरीय सुरक्षा बैठकीमध्ये सांगितलं आहे. कोणाला लक्ष्य करावं, कधी हल्ला करावा हे सुद्धा लष्करच ठरवू शकतं, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणांवर पूर्ण विश्वास असून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल कोणतीही शंका नसल्याचं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींबरोबरच्या बैठकीमध्ये हजर होते.
पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांची निवासस्थानीच भेट घेतली. भागवत यांनी मागील आठवड्यामध्ये 'धर्मा'नुसार भारताने शत्रूला शिक्षा केली पाहिजे, असं म्हटलं होतं. मंगळवारी झालेल्या बैठकीतील एक व्हिडीओ जारी करण्यात आला असून यामध्ये बैठकीत चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे.
#WATCH | PM Narendra Modi chairs a meeting with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, CDS and chiefs of all the Armed Forces. pic.twitter.com/Wf00S8YVQO
— ANI (@ANI) April 29, 2025
पंतप्रधानांनी पहलगाममधील येथील हल्ल्यानंतर घेतलेल्या दुसऱ्या बैठकीनंतर आज पंतप्रधान मोदी कॅबिनेटची बैठक घेणार आहेत. मंत्रिमंडळाशी संबंधित वेगवेगळ्या समित्यांबरोबर राजकीय आणि आर्थिक धोरणात्मक चर्चा या बैठकीमध्ये होणं अपेक्षित असून आज मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे.
"आपल्याकडे मर्यादीत वेळ असून मोठं लक्ष्य भेदायचं आहे," असं पंतप्रधान मोदींनी मंगळवारी एका शैक्षणिक कार्यक्रमातील भाषणामध्ये म्हटलं. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थांबून, "मी सध्याच्या श्थितीबद्दल बोलत नाहीये" असंही म्हटलं.