Marathi News> भारत
Advertisement

ओवैसींचा मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा! म्हणाले, 'दहशतवाद्यांना घरात घुसून मारा, आमच्या देशाचा...'

Pahalgam Terror Attack All Party Meet : सर्वपक्षीय बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी छोट्या पक्षांनाही संधी द्यावी अशी विनंती या बैठकीआधी ओवैसींनी केलेली.

ओवैसींचा मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा! म्हणाले, 'दहशतवाद्यांना घरात घुसून मारा, आमच्या देशाचा...'

Pahalgam Terror Attack All Party Meet: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये 'आयएएमआयएम'चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीपूर्वीच सर्व मुस्लिमांना शुक्रवारी होणाऱ्या नमाजानंतर या हल्ल्याचा निषेध करण्याचं आवाहन करणाऱ्या ओवेसींनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आपली रोखठोक भूमिका मांडली. 

सडेतोड उत्तर देण्याची गरज

ओवैसी यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर ओवेसींनी, "आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची गरज आहे," असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. "हा काही राजकारणाचा मुद्दा नाही. हा आता आमच्या देशाचा, आमच्या जनतेचा आणि राष्ट्रहिताचा मुद्दा झाला आहे," असं म्हणत ओवैसींनी या मुद्द्यावरुन राजकारण न करता कारवाई करणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. "सरकार या प्रकरणात जी काही कारवाई करेल त्यामध्ये आम्ही सरकारसोबत उभे राहू," असंही ओवैसींनी स्पष्ट केलं आहे. अशीच भूमिका ओवैसींनी बैठकीत मांडल्याचं सांगितलं जात आहे.

काळी पट्टी बांधून नमाजला जाण्याचं आवाहन

गुरुवारी आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ओवैसींनी, "उद्या जेव्हा तुम्ही नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा हातावर काळी पट्टी बांधून जा," असं आवाहन केलेलं. या काळ्या पट्टीच्या माध्यमातून आपण परदेशी शक्तींना भारताची शांतता आणि एकता कमकुवत करू देणार नाही असा संदेश देऊ. या हल्ल्यामुळे दुष्टांना आपल्या काश्मिरी बांधवांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. शत्रूच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन मी मी सर्व भारतीयांना करतो असं ओवैसी म्हणाले. "मी असदुद्दीन ओवेसी, आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की, काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी 27 हून अधिक नागरिकांचा जीव घेतला आहे. अनेकजण जखमी झाले असून, मृत्यू झुंज देत आहेत. माझं सर्वांना आवाहन आहे की, या दहशतवाद आणि राक्षसी अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा आपल्या हातावर काळी पट्टी बांधून जा," असं ओवैसी व्हिडीओत म्हणाले. 

"दहशतवाद्यांच्या राक्षसी कृत्याचा आपण काळी पट्टी बांधून निषेध करत कधीही इस्लामच्या नावे सामान्यांच्या हत्या करण्याची परवानगी देऊ शकत नाही असा संदेश देऊयात. देशाच्या बाहेरच्या शक्ती येऊन आपल्या देशातील नागरिकांचा जीव घेतील ही गोष्ट आपल्यापैकी कोणीही सहन करु शकत नाही," असंही ओवैसींनी या व्हिडीओत म्हटलं.

Read More