Marathi News> भारत
Advertisement

पहलगाम हल्ल्याच्या 6 दिवस आधी... पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाविषयीची धक्कादायक माहिती समोर

Pahalgam Terror Attack: भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव धुमसत असतानाच आता पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या सीआरपीएफ जवानासंदर्भातील माहितीनं तपास यंत्रणांनाही हादरा दिला आहे.   

पहलगाम हल्ल्याच्या 6 दिवस आधी... पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाविषयीची धक्कादायक माहिती समोर

Pahalgam Terror Attack: अनेक निष्पापांचा बळी घेणाऱ्या पहलगाम हल्ल्याचं उत्तर देत भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत दहशतवादी तळांवर निशाणा साधला. ज्यानंतर आता भारतातील तपास यंत्रणा शक्य त्या सर्व मार्गांनी पहलगाम हल्ल्याशी संलग्न असणारे धागेदोरे शोधण्यासाठी उपलब्ध सर्वच मार्गांनी तपास करताना दिसत आहेत. त्याचअंतर्गत नुकतीच एक खळबळजनक माहिती समोर आली असून, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका सीआरपीएफ जवानाला यंत्रणेनं ताब्यात घेतलं आहे. 

उपलब्ध माहितीनुसार सोमवारी एनआयएनं ताब्यात घेतलेला हा जवान पहलगाम हल्ल्याच्या 6 दिवस आधीसुद्धा याच भागात वावरत होता. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हल्ल्याच्या सहा दिवस आधीच या जवानाची बदली झाली होती, ज्यामुळं आता दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलेल्या या जवानाकडून आता तपास यंत्रणा कसून चौकशी करताना दिसत आहे. 

जवानावर गंभीर आरोप... 

सीआरपीएफच्या या जवानाचं नाव मोतीराम जाट असून, त्याच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. 2023 पासून हा जवान देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेच्या गुप्तचर विभागाला देत होता असा संशय व्यक्त करत या जवानाला ताब्यात घेण्यात आलं आहे. विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार सीआरपीएफमध्ये सहायक उपनिरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या जाट नामक जवानाला या हेरगिरीसाठी अनेक माध्यमातून चांगली रक्कम मोजली जात होती. 

सदर माहिती समोर येताच सीआरपीएफकडून या जवानाला तात्काळ सेवेतून बरखास्त करण्यात आलं. अधिकृत माहिती देत या संरक्षण दलानं या जवानाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष ठेवलं असता तिथं काही आक्षेपार्ह मजकूर आणि हालचाली दिसल्या ज्यानंतर त्याची चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं. या जवानानं अनेक नियमांची पायमल्ली करत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचं आढळून आलं. सध्याच्या घडीला तपास यंत्रणांकडून या जवानाची चौकशी केली जात असून, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या या सत्रात आणखी कोणाचा सहभाग आहे याचाच शोध घेतला जात आहे. 

Read More