Pakistani Pilot Caught: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. या कारवाईदरम्यान भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी पायलटला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा वैमानिक पाकिस्तानी हवाई दलाच्या जेएफ-17 लढाऊ विमानात होता. हे लढाऊ विमान भारताने पाडले. सोशल मीडियात यासंदर्भात फोटो व्हायरल केले जात आहेत. या पायलटला राजस्थानच्या लाठी येथून पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटची चौकशी सुरू आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप वैमानिकाची ओळख सार्वजनिक केलेली नाही. पण तो पाकिस्तानी हवाई दलाचा वरिष्ठ अधिकारी असू शकतो, असं मानलं जातंय.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 लोक मारले गेले. या हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले होते. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
संयुक्त राष्ट्र आणि इतर जागतिक शक्तींनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर चिंता व्यक्त केली जात असताना ही घटना घडलीय. अमेरिका आणि रशियाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केलंय. पण आम्ही आमच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही, भारताने स्पष्ट केलंय.