New Healthy Menu: महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांना खराब झालेली डाळ देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी चांगलाच राडा केला. कॅनटीनमध्ये घुसून त्यांनी कंत्राटदाराला मारहाण केल्याचं सोशल मीडियावरुन व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून आले. एकीकडे विधानसभेतील अन्न पदार्थांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 140 कोटींपेक्षा अधिक जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आता संसदेच्या कँटीनमध्ये विशेष 'हेल्दी मेन्यू देण्यात येणार आहे.
आता या हेल्दी मेन्यूमध्ये नेमकं असणार काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या हेल्दी मेन्यूमध्ये नाचणी इडली, ज्वारी उपमा, मूग डाळीचे धिरडे यांसह इतरही अनेक पदार्थांचा समावेश असेल. खासदार, अधिकारी आणि पाहुण्यांना पौष्टिकतेचा 'बुस्टर डोस' मिळणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने हा मेन्यू तयार करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी 2023 या वर्षाला 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केले होते. यामध्ये भरड धान्यांना विशेष प्रोत्साहन देऊन पांढऱ्या तांदळासह तेलकट पदार्थाना थाळीतून निरोप देण्यात आला होता. संसदेच्या कँटीनमध्येही भरड धान्याला स्थान देण्यात आले आहे. ग्रीन टी, मसाला सत्तू, कैरी पन्हे यांचा समावेश पेय पदार्थात केला आहे.
संसदेच्या कँटीनमध्ये आता सांभार आणि चटणीसह नाचणीची इडली, ज्वारी उपमा, शुगर फ्री मिश्र भरड धान्य खीर, बार्ली आणि ज्वारी सॅलड, गार्डन फ्रेश सॅलड, बॉइल्ड व्हेजिटेबल्स, रोस्ट टोमॅटो, बसिल शोरबा, व्हेज क्लिअर सूप, चणा चाट, मूग डाळीचे धिरडे यांसह ग्रीन टी, हर्बल टी, मसाला सत्तू, गुळाचे कैरी पन्हे यांचा समावेश असेल.
खासदारांबरोबरच आमदारांनाही सवलतीच्या दरामध्ये अन्नपदार्थ उपलब्ध करुन दिले जातात. आता संसदेमध्ये सर्वसाधारण मेन्यूऐवजी अधिक पौष्टीक मेन्यू पाहायला मिळणार आहे.