बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी ट्रेनवर तुफान दगडफेक केली. मधुबनी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. शेजारच्या उत्तर प्रदेश राज्यातील महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांनी स्वतंत्र सेनानी सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या काचा फोडल्या. व्हिडिओमध्ये निराश झालेले प्रवासी ट्रेनवर दगडफेक करत आहेत आणि एसी डब्यांच्या खिडक्या फोडत आहेत, ज्यामुळे आत बसलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बिहारच्या जयनगरहून प्रयागराजमार्गे नवी दिल्लीला जाणारी ही ट्रेन मधुबनी रेल्वे स्थानकावर येताच, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी उभी असल्याचं दिसून आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ट्रेन आधीच खचाखच भरलेली होती, त्यामुळे दरवाजे उघडणे अशक्य झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनची वाट पाहणारे आणि ट्रेनच्या आत असणारे अनेक प्रवासी महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला निघाले होते.
व्हिडीओत दोन महिला ट्रेनच्या आतमध्ये एसी कोचमध्ये बसलेल्या दिसत आहेत. यावेळी बाहेरील एक प्रवासी खिडकीची काच फोडली. यावेळी खिडकीजवळ बसलेल्या दोन्ही महिला भितीपोटी ओरडत असतात. दुसऱ्या एका व्हिडीओ ट्रेनच्या फुटलेल्या खिडक्या दिसत आहेत. ट्रेनमधील प्रवासी हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते.
Remember, these Dehatis have the same Voting Rights as you.
— Gems (@gemsofbabus_) February 10, 2025
Unable to board train to Maha Kumbh, people attack it with stones, break window at Madhubani Station in Bihar.
We need Pradhan Mantri Belt & Rod Yojna asap to teach basic Civic Sense.pic.twitter.com/uLlCNaoh3S
"मी माझ्या कुटुंबासह दिल्लीला निघालो होतो. त्यांनी काचा फोडण्यास सुरुवात केली. यामुळे सगळेच जण घाबरले होते. आमची मुलंही घाबरली आणि आरडाओरड सुरु केली." असं अमरनाथ झा या प्रवाशाने सांगितलं आहे. जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा रेल्वे स्थानकावर कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती असा आरोपही त्यांनी केला.
ही ट्रेन मधुबनी स्टेशनवर एक तास थांबली. नंतर कोणतीही दुरुस्ती न करता ती रवाना करण्यात आली. गोंधळ निर्माण करणाऱ्या अनेक प्रवाशांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे.
गुरुवारी रात्री बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात स्वतंत्र सेनानी एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. ही ट्रेन मुझफ्फरपूर-समस्तीपूर मार्गावर जयनगरहून दिल्लीला जात असताना त्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि ट्रेनचे किरकोळ नुकसान झाले. काही प्रवासी जखमी झाले परंतु त्यांच्यावर समस्तीपूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर पॅन्ट्री कार आणि त्याच्या शेजारी असलेल्या डब्यांच्या खिडक्या फुटल्या. स्लीपर डब्यांवरही दगडफेक करण्यात आली.
समस्तीपूर रेल्वे पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दगडफेक का करण्यात आली हे स्पष्ट नाही.