Marathi News> भारत
Advertisement

घर खरेदीसाठी SIP करणं की होम लोन घेऊन EMI भरणं योग्य? काय परवडतं? पाहा आकडेमोड

Home Loan Vs SIP Investment: घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गृहकर्ज योग्य की म्युच्यूअल फंडअंतर्गत केलेली एसआयपी योग्य? समजून घ्या संपूर्ण आकडेमोड...

घर खरेदीसाठी SIP करणं की होम लोन घेऊन EMI भरणं योग्य? काय परवडतं? पाहा आकडेमोड

Buying Home Loan Or SIP Investment What Is Best: आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र हल्ली मुंबई आणि उपनगरांबरोबरच देशातील अनेक मोठ्या शहरांतील घरांचे दर पाहिल्यानंतर घराचं स्वप्न कायम स्वप्नच राहणार की काय असंही वाटतं. सर्वसामान्यांना घर घेणंही मोठ्या जिकरीचं मानलं जातं. बहुतांश मध्यमवर्गीय लोक होम लोन म्हणजेच गृहकर्ज घेऊन घर विकत घेतात. अनेकजण तर डाऊन पेमेंटसाठी लागणारी 20 टक्के रक्कम जमा करण्यासाठी गुंतवणूक सुरु करतात. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेकजण म्यूचुअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून दिर्घकालीन गुंतवणूक सुरु करतात. घर खरेदी करण्यासाठी एक गठ्ठा मोठी रक्कम देता यावी या हेतूने एसआयपी सुरु करतात. 

ईएमआय की एसआयपी?

स्वत:चं हक्काचं घर खरेदी करण्यासाठी कोणता मार्ग अधिक सोयिस्कर ठरु शकतो याबद्दल आज आपण आजच्या या लेखात बोलणार आहोत. म्यूचुअल फंड एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला गुंतवणूक करणे की गृहकर्ज घेऊन ईएमआयच्या माध्यमातून रक्कम फेडत राहणे? या दोघांपैकी चांगला पर्याय कोणता हे जाणून घेऊयात आणि ही आकडेमोड समजून घेऊयात...

होम लोनवर घर घेतलं तर...

गृहकर्ज घेऊन तुम्हाला 50 लाखांचं घर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावं लागेल. बँक सामान्यपणे 8.75 टक्के व्याजदराने कर्ज देते. म्हणजेच दर महिन्याला 50 लाखांच्या कर्जासाठी 44 हजार 186 रुपयांचा कर्जाचा हफ्ता म्हणजेच ईएमआय द्यावा लागेल. हा एवढा ईएमआय 20 वर्षांसाठी भरावा लागेल. या कर्जावरुन तुम्ही 56 लाख 4 हजार 529 रुपये व्याज भराल. म्हणजेच हे 50 लाखांचं घर 1 कोटी 6 लाख 4 हजार 529 रुपयांचं होतं.

एसआयपीच्या माध्यमातून घर घ्यायचं असेल तर हिशोब कसा?

आता एसआयपीचा विचार करुयात. एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल तर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून 50 लाखांचा निधी उभा करावा लागेल. आता असं समजून चालूयात की तुम्ही गृहकर्जाच्या हफ्त्याइतकी म्हणजेच 44 हजार 186 रुपये इतकी रंक्कम एसआयपीमध्ये दर महिन्याला गुंतवली तर आकडेमोड कशी असेल? या आकडेमोडीनुसार अवघ्या सात वर्षांमध्ये तुमच्याकडे 50 लाख रुपये जमा होतील. हा हिशोब 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने मांडण्यात आला आहे. 

म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून 50 लाख रुपये उभे करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागेल. तर गृहकर्जाच्या माध्यमातून यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागेल. दोन्हीकडे दर महिन्याला समान रक्कम जमा केली जाईल. मात्र या आकडेमोडीमध्ये एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे एसआयपीमध्ये 12 टक्के परतावा मिळेलच असं ठामपणे सांगता येत नाही.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

Read More