Personal Finance Tips: आपल्या आजुबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात, ज्यांची कमाई तर चांगली असते पण महिनाअखेर त्यांना पैशांची चणचण भासते. मग दुसऱ्यांकडे उधारी मागावी लागते. तुमच्या ओळखीत असे कोणते मित्रमैत्रिण असतील तर त्यांना काही टिप्स तुम्ही सांगू शकता. ज्यामुळे आर्थिक नियोजनास त्यांना मदत होऊ शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
चांगली कमाई असूनही अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. गुडगावमधील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेला ३६ वर्षीय सौरव दीक्षित याच्याही बाबतीत असेच घडले. त्याचा मासिक पगार 1१ ते 1.5 लाख रुपये आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन शाळेत जाणारी मुले आहेत. त्याची पत्नी गृहिणी आहे. सौरवकडे दोन क्रेडिट कार्ड्स आहेत, पण तो फक्त त्यांची किमान रक्कमच भरू शकतो. यामुळे त्याला पुरेशी बचत आणि गुंतवणूक करता येत नाही, ज्याचा परिणाम त्याच्या निवृत्ती नियोजनावर होण्याची शक्यता आहे.
आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सौरवच्या समस्यांचे निराकरण लवकर करता येऊ शकते. त्याच्या जबाबदाऱ्यांनुसार, त्याला पैशांची टंचाई जाणवायला नको. मात्र, त्याने स्वतःहून आपल्या आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जितका विलंब तो करेल, तितक्या त्याच्या अडचणी वाढतील. आज अनेक कुटुंबे सौरवसारख्या समस्यांना तोंड देत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रत्येक महिन्याच्या शेवटी पगार बँक खात्यात जमा होतो. सौरवच्या खर्चाने त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त नसावे. त्याने प्रथम आपल्या आवश्यक खर्चाचा हिशेब करावा, ज्यात घरभाडे किंवा गृहकर्जाचा हप्ता, अन्नधान्याचा खर्च, मुलांच्या शालेय फी, वाहनांचे इंधन, विमा हप्ते इत्यादींचा समावेश आहे. या खर्चाची बेगमी केल्यानंतर, उत्पन्नातून ही रक्कम वजा करून त्याला शिल्लक रक्कम कळेल.
फालतू खर्च थांबवणे गरजेचे आहे. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याने स्वतःला विचारावे की ती वस्तूशिवाय त्याचे काम होऊ शकते का. जर होऊ शकत असेल, तर ती खरेदी रद्द करावी. आपण अनेकदा अशा गोष्टी खरेदी करतो ज्याची खरी गरज नसते. यामुळे पैसे वाया जातात, जे अधिक चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतात.
क्रेडिट कार्डमुळे खर्च करण्याची क्षमता वाढते, पण नंतर ती कर्जाच्या रूपात मोठी समस्या बनते. सौरवने प्रथम आपले क्रेडिट कार्ड बिल पूर्णपणे फेडावे. किमान रक्कम भरण्यामुळे व्याजाच्या स्वरूपात मोठा खर्च होतो. कंपनीकडून मिळालेले बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न त्याने बिल फेडण्यासाठी वापरावे. बिल फेडल्यानंतर, अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच क्रेडिट कार्डचा वापर करावा.
आपत्कालीन निधी आपल्या आर्थिक योजनांना बाधा येऊ देत नाही. असा निधी नसल्यास, अचानक खर्चासाठी बचतीचा वापर करावा लागतो. काही लोक अचानक खर्च भागवण्यासाठी म्युच्युअल फंड विकतात, जे चुकीचे आहे. यामुळे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची संधी गमावली जाते. त्यामुळे आपत्कालीन निधी तयार करणे महत्त्वाचे आहे.
पगारातील काही हिस्सा बचत आणि गुंतवणुकीसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितके जास्त फायदे मिळतील. सौरवने आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे. तो छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकतो आणि उत्पन्न वाढल्यावर गुंतवणूक वाढवू शकतो. SIP द्वारे म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करणे आज सोपे आहे, आणि दीर्घकाळात त्यांचे परतावे खूपच चांगले असतात.