Marathi News> भारत
Advertisement

Parliament Session: 'रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या...', नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सोमवारपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान हे अधिवेशन ऐतिहासिक असेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.   

Parliament Session: 'रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या...', नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आजपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या अधिवेशनात एकूण 8 विधेयके सादर होणार आहेत. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक पार पडली. महिला आरक्षण विधेयक याच अधिवेशनात मंजूर व्हावं अशी मागणी विरोधकांनी या बैठकीत केली. दरम्यान, अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावताना रडण्यासाठी फार वेळ असतो असं म्हटलं. तसंच हे अधिवेशन ऐतिहासिक होईल असा विश्वास व्यक्त केला. 

नरेंद्र मोदींनी सर्वात प्रथम चांद्रयान 3 च्या यशाचा उल्लेख केला. "चांद्रयान 3 च्या यशामुळे आपला तिरंगा फडकत आहे. शिवशक्ती पॉइंट नव्या प्रेरणेचं केंद्र ठरलं आहे. तिरंगा पॉइंट अभिमान वाढवत आहे. असं यश जेव्हा मिळतं तेव्हा जगभरात त्याला आधुनिकता, विज्ञान, तंत्रज्ञानाशी जोडून पाहिलं जातं. हे सामर्थ्य जगासमोर येतं तेव्हा भारतासाठी अनेक संधी दरवाजासमोर येऊन उभ्या राहतात. जी-20 चं अभूतपूर्व यश, 60 पेक्षा अधिक ठिकाणी जगभरातील नेत्यांचं स्वागत, मंथन आणि फेडरल संरचनेचा जिवंत अनुभव. विविधता, विशेषता सर्वानी अनुभवली. जी-20 आपल्या विविधतेचं सेलिब्रेशनचा विषय ठरला होता. या सर्व गोष्टी भारताच्या उज्वल भविष्याचे संकेत देत आहे," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. 

"एकाप्रकारे देशात उत्साहाचं वातावरण आहे. देशात एक नवा आत्मविश्वास अनुभवायला मिळत आहे. त्याचवेळी संसदेचं हे अधिवेशन होत आहे. हे अधिवेशन छोटं आहे, पण त्याची वेळ पाहिले तर हे फार मोठं आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचं एक अधिवेशन आहे. या सत्राची विशेषता म्हणजे, 75 वर्षांचा प्रवास आता नव्या टप्प्यावर सुरु होत आहे. हा अत्यंत प्रेरणादायी क्षण आहे. आता नव्या टप्प्यावरुन हा प्रवास पुढे नेत असताना नवा संकल्प, नवी ऊर्जा, नवा विश्वास आहे. 2047 मध्ये देशाला विकसित देश करायचंच आहे. त्यासाठी जितके निर्णय होणार आहेत ते नव्या संसदेत होणार आहेत. त्यासाठी अनेक प्रकारे हे अधिवेशन महत्वपूर्ण आहे," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. 

"मी सर्व खासदारांना आग्रह करतो की, हे छोटं अधिवेशन आहे. त्यांनी जास्तीत जास्त वेळ द्यावा. उत्साहाच्या वातावरणात हा वेळ द्यावा. रडण्यासाठी फार वेळ असतो, ते करत राहा. आयुष्यात असे अनेक क्षण असतात जे उमंग, विश्वासाने भरलेले असतात. मी या छोट्या अधिवेशनाकडे त्यादृष्टीने पाहत आहे. मी आशा करतोय की, जुन्या वाईट गोष्टी सोडून देत चांगल्या चांगल्या गोष्टी सोबत घेत नव्या नव्या संसदेत प्रवेश करु," असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. 

पुढे ते म्हणाले, "उद्या गणेशचतुर्थी आहे. गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं. भारताच्या विकासात आता कोणतंही विघ्न येणार नाही. निर्विघ्नपणे सर्व स्वप्न, संकल्प भारत पूर्ण करेल. यासाठी  गणेशचतुर्थीच्या दिवशी हा नवा प्रवास नव्या नव्या भारताची सर्व स्वप्नं पूर्ण होण्यास मदतशीर ठरेल. हे अधिवेशन छोटं असलं तरी फार मौल्यवान आहे". 

 

Read More