Marathi News> भारत
Advertisement

व्हीआयपी संस्कृतीवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भावाला वेगळा न्याय का?- रॉबर्ट वड्रा

स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारायचे नसतात.

व्हीआयपी संस्कृतीवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भावाला वेगळा न्याय का?- रॉबर्ट वड्रा

नवी दिल्ली: व्हीआयपी संस्कृतीवरून इतरांवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाला वेगळा न्याय कसा लागू होतो, असा सवाल प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी उपस्थित केला. रॉबर्ट वड्रा यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसाठी अतिरिक्त वाहन न दिल्यामुळे मंगळवारी पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. हाच धागा पकडत रॉबर्ट वड्रा यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

या पोस्टमध्ये रॉबर्ट वड्रा यांनी म्हटले आहे की, स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारायचे नसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. त्यांचे बंधू पोलिसांकडून एस्कॉर्ट व्हॅन मिळत नाही म्हणून थेट धरणे आंदोलन करायला बसले. हेच अच्छे दिन म्हणायचे का?, असा खोचक सवाल रॉबर्ट वड्रा यांनी मोदींना विचारला. 

नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी मंगळवारी राजस्थानच्या बागरू पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. पोलिसांकडून आपल्या पुरेशी सुरक्षा दिली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. राज्य सरकार माझ्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतंत्र वाहन देत नाही, अशी त्यांची तक्रार होती. दोन वर्षांपूर्वी माझ्या सुरक्षारक्षकांची संख्या निम्म्याने कमी करण्यात आली. मात्र, मी तेव्हा काहीच न बोलता हा निर्णय स्वीकारला. यानंतर माझ्या आईच्या घराभोवतीचे दोन सुरक्षा रक्षकही कमी करण्यात आले. तेव्हादेखील आम्ही पोलिसांच्या निर्णयाचा आदर केला, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. 

Read More