Political News : दक्षिणेकडील नेते आणि केंद्र शासनासह किंवा केंद्र शासनाप्रतीच्या त्यांच्या भूमिका कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच आता आणखी एका नावाचा समावेश झाला असून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष या चेहऱ्यानं वेधलं आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार आणि तामिळगा वेत्री कझगम पक्षप्रमुख विजय पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. पक्षाच्या पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी डीएमके आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आणि त्याच्या वक्तव्यांनंतर या अभिनेत्याच्या राजकीय कारकिर्दीविषयी समर्थकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.
तमिलगा वेत्री कझगम (TVK) च्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान विजयनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना काही राजकीय समीकरणांवर कटाक्ष टाकला. जिथं द्रमुकची काँग्रेससोबत युती आहे तिथेच भाजपसोबतही त्यांची अलिखित युती आहे असं म्हणत त्यानं हिंदी भाषेसाठीची आग्रही भूमिका, जीएसटी कलेक्शन, महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी, मोदी सरकारची वन नेशन वन इलेक्शन पॉलिसी अशा अनेक मुद्द्यांवर त्यानं चर्चा केली.
अतिशय फिल्मी अंदाजात सरकारवर निशाणा साधत विजयनं केलेल्या वक्तव्यांची सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली. तुम्ही कधीही हवा अडवण्याचा प्रयत्न केला तर, ती अतिप्रचंड ताकदीच्या वादळामध्ये रुपांतरित होते, असं म्हणताना तामिळनाडूला जरा सावधगिरीनं सांभाळा अशी स्पष्टच विनंती पंतप्रधानांकडे केली. हे एक असं राज्य आहे ज्याला कायम वाईटच वागणूक मिळाली आहे ही बाब अधोरेखित करताना आम्ही दुफळी माजवणाऱ्यांविरोधात असून बंधुभाव, सामाजिक न्याय आणि सांप्रदायिक सौहार्दाचे पुरस्कर्ते आहोत या वक्तव्यावर त्यानं जोर दिला.
द्रमुक आणि भाजपवर निशाणा साधताना विजयनं त्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काही स्पष्ट भूमिकांनी केली होती. तामिळनाडूमध्ये दोन भाषा प्राधान्यस्थानी असून या धोरणाअंतर्गत विद्यार्थी इंग्रजी आणि तामिळ शिकतात त्यामुळं इथं तिसऱी भाषा न आणता दोन भाषांचच धोरण कायम रहावं असा इशारा त्यानं सत्ताधाऱ्यांना दिला.