RailOne App: भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे, जी 1853 मध्ये स्थापन झाली. यामध्ये सुमारे 68,000 किमी रेल्वे मार्ग, 7,300 पेक्षा जास्त स्थानके आणि दररोज 23 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वे 1.3 दशलक्ष कर्मचारी असलेली देशातील सर्वात मोठी नियोक्ता आहे. यामध्ये मेल/एक्सप्रेस, सुपरफास्ट, शताब्दी, राजधानी, दुरंतो, मालवाहतूक आणि उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. ही रेल्वे भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु गर्दी, तिकीट उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासारख्या आव्हानांचाही सामना करते. दरम्यान रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या विविध सुविधा तुम्हाला एकाच अॅपवर मिळणार आहे.
रेल्वे प्रवासी सेवांसाठी एक-स्टॉप सोल्यूशन असलेल्या RailOne अॅपचे लाँचिंग करण्यात आले आहे. हे अॅप अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि iOS अॅप स्टोअर दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या अॅपमध्ये R-Wallet (रेल्वे ई-वॉलेट) ची सुविधा देखील आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात या अॅपचे उद्घाटन केले. RailOne अॅप हे प्रवाशांच्या सर्व आवश्यक सेवांसाठी एक-स्टॉप सोल्यूशन आहे. या अॅपद्वारे, प्रवाशांना पुढील सेवांमध्ये सहज प्रवेश मिळतो: तिकीट - राखीव, अनारक्षित, प्लॅटफॉर्म तिकिटे; ट्रेन आणि पीएनआर चौकशी, प्रवास नियोजन, रेल्वे मदत सेवा, ट्रेनमध्ये जेवण बुकिंग. तसेच, त्यात मालवाहतुकीशी संबंधित चौकशीची सुविधा देखील आहे.
रेल्वे प्रवाशांना चांगला अनुभव देणे हा यामागचा उद्देश आहे. यामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी असून सेवांमध्ये एकात्मिक कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. यामध्ये रेल्वे प्रवाशांना भारतीय रेल्वे सेवांचे समग्र पॅकेज मिळते.
रेलवन आपल्या प्रवाशांसाठी 'वन स्टॉप सोल्यूशन' बनणार आहे. ज्यामध्ये रेल्वेच्या अनेक सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणल्या गेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला या 9 सुविधा (रेलवन फीचर्स) मिळतील...
आरक्षित तिकीट बुकिंग
अनारक्षित तिकीट बुकिंगची सुविधा
प्लॅटफॉर्म तिकिटे घेऊ शकाल
मासिक तिकीट पास मिळू शकेल
ट्रेनचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करू शकाल
पीएनआर स्थिती तपासू शकाल
ऑनलाइन फूड ऑर्डरची सुविधा
तक्रारींसाठी रेल्वेची मदत
सिंगल साइन-ऑन हे या अॅपचे एक खास वैशिष्ट्य आहे. यामुळे यूजर्सना अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नसते. RailOne अॅप डाउनलोड केल्यानंतर RailConnect किंवा UTSonMobile अॅपचे सध्याचे यूजर्स आयडीचा वापर करून लॉगिन करु शकतात. यामुळे यूजर्सना वेगवेगळ्या सेवांसाठी वेगळे अॅप्स ठेवण्याची आवश्यकता नाही. ज्यामुळे डिव्हाइस स्टोरेज देखील वाचते. या अॅपमध्ये R-Wallet (रेल्वे ई-वॉलेट) सुविधा देखील जोडण्यात आली आहे. संख्यात्मक mPIN आणि बायोमेट्रिक लॉगिन सारख्या सोप्या लॉगिन सुविधा देखील देण्यात आल्या आहेत.नवीन यूजर्ससाठी किमान माहिती देऊन नोंदणी करण्याची तरतूद आहे, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया सोपी आणि जलद होते. फक्त चौकशी करणारे वापरकर्ते गेस्ट लॉगिनद्वारे मोबाइल नंबर आणि OTP वापरून देखील लॉगिन करू शकतात.