Ganta Tejeshwar murdered: तेलंगणाच्या जोगलुंबा गदवाल जिल्ह्यातील एक धक्कादायक हत्याकांड समोर आलं आहे. ऐश्वर्या नावाच्या तरुणीने आपल्या आईचा प्रियकर तिरुमाला रावसोबत मिळून आपला पती तेजेश्वरची हत्या केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे प्रकरण मध्य प्रदेशच्या राजा रघुवंशी हत्याकांडाशी इतकं मेळ खाणारं आहे की, ऐश्वर्याला दुसरी सोनम सूर्यवंशी म्हटलं जात आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, 32 वर्षीय गंता तेजेश्वर हा गडवालमधील राजविधिनगरचा रहिवासी होता. तो जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा. 18 मे 2025 रोजी त्याचं 23 वर्षीय ऐश्वर्याशी लग्न झालं. पण या लग्नासाठी ऐश्वर्याची संमती नव्हती. ऐश्वर्या आधीच कुर्नूलमधील एका गृहनिर्माण वित्त कंपनीच्या व्यवस्थापक तिरुमला रावच्या प्रेमात पडली होती, जो तिच्यापेक्षा सुमारे १२ वर्षांनी मोठी होता.
धक्कादायक गोष्ट म्हणजे तिरुमला हा ऐश्वर्याची आई सुजाताचा प्रियकर होता, जी त्याच कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करत होती. सुजाताला आपली मुलगी आणि तिरुमला यांच्यातील नात्याची जाणीव होती, परंतु तिला मुलीने त्याच्याशी लग्न करावं असं वाटत नव्हतं. यामुळे तिने तेजेश्वर नावाचा मुलगा शोधला आणि त्याला तिची मुलगी ऐश्वर्याशी लग्न करण्यास सांगितलं आणि सतत त्याच्यावर दबाव आणत राहिली.
लग्नापूर्वी ऐश्वर्या एकदा घरातून पळून गेली होती, पण नंतर ती परत आली आणि तिच्या आईच्या पसंतीच्या मुलगा तेजेश्वरशी लग्न केलं. पण तिच्या मनात तिरुमलाच होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी ते जून 2025 पर्यंत, ऐश्वर्या आणि तिरुमला यांनी 2000 हून अधिक वेळा फोनवरुन संवाद साधला. अगदी लग्नाच्या दिवशीही दोघेही व्हिडिओ कॉलवर होते.
लग्नानंतरही ऐश्वर्या आणि तिरुमला यांचं नातं कायम होतं. पण लग्नानंतर त्यांना आपलं नातं कायम ठेवण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघांनीही तेजेश्वरला संपवण्याचा कट रचला होता. दोघांच्या हत्येची योजना अगदी सोनम रघुवंशीने तिच्या प्रियकरासोबत केलेल्या राजाच्या हत्येसारखीच होती.
प्रियकर तिरुमलाने कमिशन एजंट कुमारी नागेशला तेजेश्वरचा फोन नंबर दिला आणि त्याच्याशी मैत्री करण्यास सांगितलं. नागेश आणि तिच्या साथीदारांनी संबंध निर्माण केले आणि तेजेश्वरच्या दुचाकीवर जीपीएस ट्रॅकर बसवून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. 17 जून रोजी तेजेश्वरला जमीन सर्वेक्षणाच्या बहाण्याने कुर्नूलला नेण्यात आलं. परत येताना एरावल्ली आणि गडवाल दरम्यान कारमध्ये त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. तेजेश्वरच्या डोक्यावर वार करण्यात आले, गळा चिरण्यात आला आणि पोटात वार करण्यात आले. तिरुमलाच्या सूचनेनुसार, मृतदेह कुर्नूलमधील एचएनएसएस कालव्याजवळ फेकण्यात आला. मारेकऱ्यांनी तेजेश्वरचा मोबाईल आणि सामान कालव्यात फेकून दिले. तिरुमलाने मारेकऱ्यांना आधी 1 लाख आणि नंतर 2 लाख रुपये दिले.
ऐश्वर्या आणि तिरुमला यांनी रचलेला हत्येचा कट मेघालयातील राजा-सोनम घटनेसारखाच आहे. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत तिचा पती राजाच्या हनिमूनदरम्यान हत्येचा कट रचला होता. तेजेश्वरला संपवण्यासाठी ऐश्वर्या आणि तिरुमला यांनी सुपारी किलरही ठेवले होते आणि हत्येनंतर लडाखला पळून जाण्याची योजना आखली होती.
तेजेश्वर बेपत्ता झाल्यानंतर, त्याच्या भावाने 1 जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेजेश्वर काही ओळखीच्या लोकांसह कारमध्ये गेल्याचं उघड झालं. 21 जून रोजी त्याचा मृतदेह कुर्नूलजवळील एका कालव्यात आढळला. पोलिसांनी ऐश्वर्या, तिरुमला आणि इतर सहा आरोपींना अटक केली आहे. तपासात असेही समोर आले आहे की तिरुमलाने यापूर्वी त्याच्या पत्नीच्या हत्येचा कट रचला होता, परंतु तो अयशस्वी झाला.